बहुपक्षीय लोकशाहीला मतदारांची पसंती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:13 IST2021-05-08T04:13:58+5:302021-05-08T04:13:58+5:30
नाशिक : भारतात बहुपक्षीय लोकशाही टिकली पाहिजे, या भावनेतून मतदारांनी पाच राज्यांच्या निवडणुकीत कौल दिला, असे ठाम मत ज्येष्ठ ...

बहुपक्षीय लोकशाहीला मतदारांची पसंती !
नाशिक : भारतात बहुपक्षीय लोकशाही टिकली पाहिजे, या भावनेतून मतदारांनी पाच राज्यांच्या निवडणुकीत कौल दिला, असे ठाम मत ज्येष्ठ पत्रकार ॲड. सुरेश भटेवरा यांनी व्यक्त केले.
डिजिटल वसंत व्याख्यानमालेत ते बोलत होते, स्व. उत्तमराव ढिकले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, पाँडिचेरी विधानसभा निवडणूक निकालांचे विश्लेषण’ या विषयावर भटेवरा यांनी सातवे पुष्प गुंफले. भारतीय लोकशाहीवर, सहिष्णुतेवर, धर्मनिरपेक्षतेवर त्यांच्यासाठी सारेच काही संपले नाही, हे या निवडणूक निकालाने दाखवून दिले आहे. बंगाल जिंकायचाच म्हणून मोदी, शहा, नड्डा यांनी सर्वस्व पणाला लावले. सरकारी यंत्रणा, केंद्रीय मंत्र्यांची फौज, इतकेच काय तर निवडणूक आयोगानेही आज्ञाधारक मुलाप्रमाणे काम केले; पण प्रादेशिक अस्मिता बंगालमध्ये सरस ठरली, असेही भटेवरा यांनी स्पष्ट केले. भाजपला काँग्रेसमुक्त भारत नाही, तर विरोधकमुक्त भारत करायचा आहे. भाजपची ही सत्तालोलुपता वाढत चालली असून, पर पक्षातील उमेदवारांबद्दल त्यांचे प्रेम उतू जाणारे आहे. स्थानिक नेतृत्वाला संधी देण्याची ताकद मोदी-शहा यांच्याकडे नाही. त्यांच्या दिखाऊ प्रचारास मतदार भुलले नाहीत. याचा अर्थ लोकांमध्ये राजकीय शहाणपण पुन्हा दिसायला लागले, असा या निवडणूक निकालांचा खरा अन्वयार्थ असल्याचे भटेवरा यांनी सांगितले. आसाम, तामिळनाडू आदी राज्यांचा निवडणुकीतून हेच प्रकर्षाने दिसून आले. स्पर्धात्मक राजकारणाची ही सुरुवात असून, समानतेचे वातावरण निर्माण होत असल्याने ही शुभसूचक घटना आहे. या निवडणुकीत अँटी इन्कम्बन्सी दिसून आली नाही. काँग्रेससह डाव्यांनीही एकाधिकारशाहीच्या विरोधात भूमिका घेतली आणि त्यामुळे भाजपच्या वारूला लगाम बसल्याचे भटेवरा म्हणाले. याप्रसंगी मविप्रचे चिटणीस डॉ. सुनील ढिकले उपस्थित होते. व्याख्यानमालेचे अध्यक्ष श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले, तर संगीता बाफना यांनी आभार मानले.
फोटो
०७भटेवरा