मतदार याद्यांमध्ये घोळ

By Admin | Updated: January 10, 2017 01:16 IST2017-01-10T01:15:48+5:302017-01-10T01:16:01+5:30

महानगरपालिका निवडणूक : गुरुवारी मतदार यादी प्रसिद्ध

In the voters' list | मतदार याद्यांमध्ये घोळ

मतदार याद्यांमध्ये घोळ

नाशिक : फेबु्रवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांवर अंतिम हात फिरविण्याची तयारी प्रशासकीय पातळीवर सुरू असली तरी मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ झाल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त होत आहेत. येत्या गुरुवारी (दि.१२) मतदार याद्या प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर दि. १७ जानेवारीपर्यंत हरकती मागविल्या जाणार आहेत. त्यामुळे महापालिकेकडे हरकतींचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांचे नवीन प्रभागांनुसार विभाजन करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या गुरुवारी (दि.१२) मतदार याद्या महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केल्या जाणार असून, राजीव गांधी भवनमधील मुख्यालयासह सहाही विभागीय कार्यालयात मतदार याद्या पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्यानंतर दि. १२ ते १७ जानेवारी या कालावधीत मतदार याद्यांसंबंधी हरकती व सूचना मागविल्या जाऊन दि. २१ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, प्रारूप मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घोळ असल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे प्राप्त होत आहेत. प्रामुख्याने, मतदार याद्यांचे विभाजन करताना अनेकांचा रहिवास एका प्रभागात तर मतदार यादीत नाव दुसऱ्या प्रभागात दर्शविण्यात आले आहे. काही प्रभागात तर २० हजारांहून अधिक मतदारांची नावे स्थलांतरित करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. याशिवाय, काही मतदारांची केवळ आडनावेच देण्यात आली आहेत. काही प्रभागात मध्येच अनेक मतदारांची नावे गायब केल्याच्याही तक्रारी आहेत, तर अनेकांचे नाव विधानसभा मतदारसंघाच्या यादीत असताना महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीत नसल्याचा आरोप होत आहे. मतदार यादीत मोठ्या प्रमाणावर घोळ दिसून येत असल्याने विद्यमान नगरसेवकांसह इच्छुकांचे धाबे दणाणले असून, मतदार याद्या दुरुस्तीसाठी महापालिकेत चकरा वाढल्या आहेत.

Web Title: In the voters' list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.