मतदार नोंदणीची अर्हता निश्चित
By Admin | Updated: September 30, 2016 02:04 IST2016-09-30T01:55:24+5:302016-09-30T02:04:36+5:30
पदवीधर मतदारसंघ : ४00 नोंदणी केंद्रांवर नावनोंदणीची व्यवस्था

मतदार नोंदणीची अर्हता निश्चित
नाशिकरोड : निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाशिक पदवीधर मतदारसंघासाठी नव्याने मतदारयादी तयार करण्याच्या कार्यक्रमाची घोषणा विभागीय महसूल आयुक्त एकनाथ डवले यांनी केली. या मतदार नोंदणीसाठी १ नोव्हेंबर २०१६ ही अर्हता दिनांक निश्चित करण्यात आली असून, नाशिक विभागात एकूण ४०० मतदार नोंदणी केंद्रावर पदवीधरांना नावनोंदणी करता येणार आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघाचे सदस्य डॉ. सुधीर तांबे यांचा कालावधी येत्या ५ डिसेंबर रोजी संपणार आहे. त्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी नवीन मतदारयादी तयर केली जाणार आहे. ज्या पदवीधरांकडे १ नोव्हेंबर २०१६ रोजी तीन वर्षांपूर्वी प्राप्त केलेले कोणत्याही विद्यापीठाचे पदवी प्रमाणपत्र आहे, असे पदवीधर मतदारयादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आपला अर्ज दाखल करू शकणार आहेत. यापूर्वीच्या मतदारयादीत नावे असलेल्या पदवीधर मतदारांनाही पुन्हा नव्याने अर्ज भरावा लागणार आहे. याकरिता येत्या १ आॅक्टोबरपासून विभागात सर्वत्र मतदार नोंदणी सुरू होणार आहे.
मतदार नावनोंदणीसाठी सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांना सहायक मतदान नावनोंदणी अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, तर ३५ जिल्हाधिकारी दर्जाचे अधिकारी सहायक मतदारनोंदणी अधिकारी असणार आहेत. याशिवाय विभागातील ७० तहसीलदार दर्जाचे पदनिर्देशित अधिकारी आणि ३५७ मंडळ अधिकारी यांची याकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. एक गठ्ठा प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नसल्याचे विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी सांगितले. मात्र कुटुंब प्रमुखाला त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे एखाद्या आस्थापना प्रमुखांना त्यांच्या आस्थापनेवरील सर्व पदवीधर कर्मचाऱ्यांचे अर्ज मतदार नोंदणी अधिकाऱ्यांकडे सादर करण्यास मुभा देण्यात आली आहे. विभागातील सर्व जिल्हाधिकारी मंडळ, अधिकारी, तहसीलदार व विभागीय आयुक्त कार्यालयात मतदान नोंदणी अर्ज स्वीकारण्याची सोय केली असून, पदवीधरांनी आपले मतदार नोंदणी अर्ज ५ आॅक्टोबरपर्यंत सादर करण्याचे आवाहन डवले यांनी केले आहे. यावेळी प्रशासन उपायुक्त ज्ञानेश्वर खिलारी, तहसीलदार श्रीमती एस. डी. मोहिते, माहिती उपसंचालक सतीश लळित, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)