एचपीटी महाविद्यालयात मतदार नोंदणी अभियान
By Admin | Updated: September 26, 2016 01:35 IST2016-09-26T01:35:26+5:302016-09-26T01:35:57+5:30
आवाहन : अर्ज स्वीकृती केंद्र स्थापन

एचपीटी महाविद्यालयात मतदार नोंदणी अभियान
नाशिक : फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार नोंदणी अभियानाला सुरुवात झाली असून, गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी महाविद्यालयात नोंदणी अर्ज स्वीकृती केंद्र स्थापन करण्यात आले. दरम्यान, महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी विद्यार्थ्यांना मतदार नोंदणीचे आवाहन केले.
महापालिकेच्या वतीने विशेष मतदार नोंदणी पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत शहरातील २७ महाविद्यालयांमध्येही मतदार जागृती केली जात आहे. त्यानुसार एचपीटी व आरवायके महाविद्यालयांत अर्ज स्वीकृती केंद्राची स्थापना करण्यात आली.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी सांगितले, लोकशाहीत नागरिकांचा सहभाग आवश्यक असून, चांगले लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. त्यासाठी चांगल्या लोकशाहीची सुरुवात करण्यासाठी सर्व पात्र विद्यार्थ्यांनी त्यांची नावे मतदार यादीत नोंदवावीत, असे आवाहन केले.
यावेळी मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनीही मतदार नोंदणीसाठी आवश्यक असलेला नमुना नं. ६ हा अर्ज कसा भरावा व त्यासाठी लागणारी कागदपत्रे, कार्यपद्धती यांची माहिती दिली. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एन. सूर्यवंशी यांनी अभियानात जास्तीत जास्त सहभाग नोंदवून त्यांच्यामार्फत विद्यार्थी राहत असलेल्या २५ ठिकाणी जाऊन अर्ज जमा करण्यासाठी जागृती करणार असल्याचे सांगितले.
यावेळी उपप्राचार्य श्रीमती सिंग, मनपाचे सहायक आयुक्त एस. डी. ठाकरे, केंद्र प्रमुख कल्पना पाटील व नितीन पवार आदि उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. वावळे यांनी केले. (प्रतिनिधी)