मतदार याद्यांतील घोळ; मनपा प्रशासनाकडे बोट
By Admin | Updated: March 1, 2017 00:31 IST2017-03-01T00:31:04+5:302017-03-01T00:31:16+5:30
नाशिक : जिल्हा परिषदा व महापालिका निवडणुकीत मतदार याद्यांतील घोळप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने बोलावलेल्या बैठकीत उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाकडे अंगुलीनिर्देश केला आहे.

मतदार याद्यांतील घोळ; मनपा प्रशासनाकडे बोट
नाशिक : राज्यभरातील जिल्हा परिषदा व महापालिका निवडणुकीत मतदार याद्यांतील घोळप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने बोलावलेल्या बैठकीत उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाकडे अंगुलीनिर्देश केला आहे.
जिल्हा प्रशासनाने सुपूर्द केलेल्या मतदार याद्या फोडताना आणि त्यांची प्रभागनिहाय रचना करताना चूक केल्याचे सांगत जिल्हा प्रशासनाची बाजू मांडली. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपेक्षा महापालिका निवडणुकीत मतदार याद्यांमध्ये अधिक प्रमाणात घोळ असल्याचे समोर आले आहे. महापालिका प्रशासनाने प्रभागनिहाय याद्यांची रचना करणासाठी यांद्यांचे गठ्ठे तोडताना आणि त्यांची पुनर्बांधणी करताना चुका केल्यामुळेच मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्य निवडणूक आयोगाला यंत्रणेत सुधारणा करण्यास सुचवले आहे. मतदार याद्यांतील घोळ टाळण्यासाठी मतदार याद्यांचे संगणकीकरण करताना नाव व पत्ता तंतोतंत अद्ययावत करण्याचा पर्याय उपलब्ध होणे आवश्यक असल्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)