नाशिक : सतारीच्या तारांमधून झंकारणाऱ्या स्वरांना राग चारुकेशीचा साज चढला अन् रसिकांची अवस्था ‘आनंदाचे डोही आनंद तरंग’ अशी होऊन गेली... निमित्त होते प्रसाद रहाणे यांच्या सतारवादनाचे. ऋग्वेद तबला अकादमीच्या वतीने गुरुपौर्णिमेनिमित्त पारनेरकर सभागृहात हा कार्यक्रम रंगला. रहाणे यांनी सतारीवर चारुकेशी राग सादर करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांना गौरव तांबे यांनी तबल्यावर साथसंगत केली. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी, पूर्णवाद परिवाराचे देवेंद्र जोशी, दिलीप गोटखिंडीकर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी जोशी म्हणाले, कोणत्याही कलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेणे गरजेचे असते. विद्येसाठी मस्तक हवे असते, तर कलेसाठी मस्तक आणि हृदय दोन्ही लागते. म्हणूनच कला हृदयापासून जोपासायला हवी. ‘ऋग्वेद’चे संचालक प्रमोद भडकमकर यांनी प्रास्ताविक केले. वैष्णवी भडकमकर व पीयूषा कुरणे यांनी मुखड्याच्या बंदिशी तबल्यावर सादर केल्या. त्यांना आस्था मांदाळे यांनी स्वरसाथ केली, तर दिव्या जोशी-रानडे यांनी संवादिनीची साथ दिली. शलाका गोटखिंडीकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी नितीन पवार, नितीन वारे, मोहन उपासनी, कीर्ती भवाळकर आदि उपस्थित होते.
‘चारुकेशी’च्या स्वरांनी सतारवादनाला रंगत
By admin | Updated: August 9, 2015 23:22 IST