नाशिक, जालना, औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यांना देणार भेटी
By Admin | Updated: May 20, 2015 23:54 IST2015-05-20T23:48:43+5:302015-05-20T23:54:59+5:30
स्वच्छतागृहांची होणार तपासणी; केंद्राचे पथक राज्याच्या दौऱ्यावर

नाशिक, जालना, औरंगाबाद व अहमदनगर जिल्ह्यांना देणार भेटी
नाशिक : राज्यातील स्वच्छतागृहांच्या बांधकामांची पाहणी व तपासणी करण्यासाठी केंद्र सरकारचे दोन पथके २५ ते २८ मे दरम्यान राज्याच्या दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात नाशिकसह अहमदनगर, औरंगाबाद व जालना या जिल्ह्यांतील स्वच्छतागृहांच्या बांधकामांची पाहणी व तपासणी हे पथक करणार आहे.
यासंदर्भात महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने नाशिकसह वरील तीनही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तातडीचे पत्र पाठवून या दौऱ्यासंदर्भात माहिती दिली आहे. केंद्र सरकारचे मानव संसाधन विभागाचे उपसचिव विरेंद्र सिंग यांच्या ३० एप्रिल २०१५च्या पत्रानुसार राज्यातील स्वच्छतागृहांच्या बांधकामांची पाहणी करण्यासाठी उपसचिव श्रीमती अनामिका सिंग, मुख्य सल्लागार सुनिशा अहुजा ही द्विसदस्यीय समिती २५ ते २८ मे दरम्यान या चारही जिल्ह्यांच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षण अभियानाचे मुख्य अभियंता सुभाषचंद्र दक्षित, कार्यकारी अभियंता राजेंद्र शहाडे, उपअभियंता योगेश बोराडे, प्रकल्प अभियंता अमोल पोतदार प्रकल्प संचालक महेश करजगावकर आदिंना समन्वयक म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. २५ तारखेला या समितीचे सायंकाळी ५ वाजता औरंगाबादला आगमन होणार असून, औरंगाबाद जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी व अभियंता यांच्याशी चर्चा करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)