पंचवटीत मतमोजणी दरम्यान जमावाला हिंसक वळण
By Admin | Updated: February 24, 2017 01:11 IST2017-02-24T01:11:03+5:302017-02-24T01:11:17+5:30
पंचवटीत मतमोजणी दरम्यान जमावाला हिंसक वळण

पंचवटीत मतमोजणी दरम्यान जमावाला हिंसक वळण
नाशिक : आमदार तथा भाजपा शहराध्यक्ष यांच्या प्रभाव असलेल्या मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या आमदारपुत्र तसेच इतर उमेदवारांकडे संपूर्ण शहरवासीयांचे लक्ष लागून होते़ प्रभाग तीनमधील मतमोजणीच्या पहिली फेरीत भाजपाच्या सर्वच उमेदवारांनी घेतलेली आघाडी ही आमच्या बालेकिल्ल्यातून असून इतके मतदान शक्य नाही, या कारणावरून मतमोजणी यंत्रातील अफरातफरीचा आरोप करून विरोधकांनी गोंधळ घातला़ यामुळे तब्बल अडीच तास बंदं पडलेल्या मतमोजणीमुळे बाहेर अफवा पसरून हजारोंचा जमाव जमला. या जमावास पांगविण्यासाठी पोलिसांनी केलेल्या लाठीमार व प्रत्युतरादाखल जमावाने केलेल्या दगडफेकीत सुमारे दहा पोलीस कर्मचारी जखमी झाले असून, हिंसक जमावाला थोपविण्यासाठी हवेत गोळीबार करण्यात आला़
प्रभाग तीनच्या मतमोजणी उशीर झाल्याने तसेच याबाबत शहरात विविध अफवा पसरून सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास हजारोंचा जमाव मीनाताई ठाकरे स्टेडियमवर चालून आला़ पोलिसांनी या जमावास थांबविण्याचा प्रयत्न केला असता जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता़ यामुळे पोलिसांनी लाठीमार करण्यास प्रारंभ केला़ यामुळे स्टेडियमबाहेरील जमावामध्ये पळापळ सुरू झाली़ या जमावाने थोडे दूर गेल्यानंतर पोलिसांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली़ (प्रतिनिधी)