विजयनगर जोड रस्त्यावर व्यावसायिकांचे अतिक्रमण
By Admin | Updated: December 30, 2015 23:10 IST2015-12-30T23:00:43+5:302015-12-30T23:10:07+5:30
नागरिकांचा आरोप : मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष

विजयनगर जोड रस्त्यावर व्यावसायिकांचे अतिक्रमण
पंचवटी : नवीन आडगाव नाक्यावरील विजयनगर सोसायटी नजीकच्या जोड रस्त्यावर विविध वस्तू विक्रेते तसेच हातगाडीधारकांनी अतिक्रमण केल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली असून, या अतिक्रमणाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला जात आहे.
विजयनगर परिसरात दाट लोकवस्ती असून, या विजयनगरच्या प्रवेशद्वारालगत असलेल्या भिंतीनजीक खाद्यपदार्थ विक्री, चायनीज गाड्या, पानटपरी तसेच मटन मांस विक्री करणारी दुकाने थाटलेली असल्याने परिसराला बकाल स्वरूप प्राप्त झाले आहे. उघड्यावरच असलेल्या मटन मांस विक्रीच्या दुकानामुळे मोकाट श्वानांचाही उपद्रव वाढला आहे. याशिवाय हातगाड्यावर अनेक टवाळखोर उभे राहत असल्याने वाद होण्याची शक्यता असते. गेल्या अनेक दिवसांपासून या भागातील जोड रस्त्यावर विविध व्यावसायिकांनी दुकाने थाटल्याने त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत आहे. याशिवाय व्यावसायिकांची, तसेच त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांची वाहने रस्त्यावरच उभी केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. महापालिका प्रशासनाच्या वतीने संपूर्ण शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू असली तरी नवीन आडगाव नाक्यावरील विविध व्यावसायिकांच्या अतिक्रमणाकडे मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)