कवडदरा,साकूर परिसरातील गावे तीन दिवसांपासून अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2021 01:26 IST2021-03-10T22:01:20+5:302021-03-11T01:26:35+5:30
कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकुर परिसरातील सर्व गावे मागील तीन दिवसांपासून अंधाराच्या साम्राज्यात आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात अ्राहे.

कवडदरा,साकूर परिसरातील गावे तीन दिवसांपासून अंधारात
कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा, साकुर परिसरातील सर्व गावे मागील तीन दिवसांपासून अंधाराच्या साम्राज्यात आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात अ्राहे.
विजेच्या अभावामुळे ह्या भागातील सर्व व्यवहार ठप्प झाले असून ग्रामीण भागात वीज मंडळाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. पाणीपुरवठा योजना, बँकिंग, आरोग्य आदींसह सिन्नर घोटी महामार्गावरील व्यवसाय धोक्यात आले आहेत. ह्या प्रकरणी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालून वीजप्रवाह सुरळीत करावा. अन्यथा कोणत्याही क्षणी ग्रामस्थांच्या संतापाचा उद्रेक होऊन आक्रमक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते आत्माराम फोकणे यांनी दिला आहे.
गेल्या तीन दिवसांपासून कवडदरा साकुर परिसरासह एसएमबीटी रुग्णालय ते धामणगावपर्यंतच्या सर्व गावात वीज गायब आहे. वीज कर्मचाऱ्यांकडून वीजपुरवठा लवकरच सुरळीत करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र नेमके काय चालले आहे याबाबत ह्या भागात अनभिज्ञता आहे. एसएमबीटी, कवडदरा, भरविर खुर्द, भरवीर बुद्रूक, धामणगाव, घोटी खुर्द, साकुर, निनावी, शेणीत, पिंपळगाव डुकरा, पिंपळगाव घाडगा ही सर्व गावे तीन दिवसांपासून अंधारात आहेत. वीजपुरवठा खंडित असल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बँकेचे व्यवहार बंद पडल्याने मोठी गैरसोय होत आहे.
अनेक गावांचा पाणीपुरवठा बंद
वीजपुरवठा खंडित असल्याने पिठाच्या गिरण्या बंद आहेत. तसेच अनेक गावांचा पाणीपुरवठा देखील बंद आहे. पाणी उपलब्ध असतांनाही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दुसरीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणावर परिणाम झाला आहे. विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून वंचित राहात आहे.
गेल्या तीन दिवसांपासून वीज गायब असल्याने सर्व व्यवहार ठप्प आहेत. वीज मंडळाने अधिक अंत न पाहता युद्धपातळीवर काम करून वीजप्रवाह सुरळीत करावा. अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागेल.
-आत्माराम फोकणे, सामाजिक कार्यकर्ते, घोटी खुर्द