त्र्यंबकरोडवरील अपघातांमुळे ग्रामस्थ त्रस्त
By Admin | Updated: December 21, 2015 23:01 IST2015-12-21T23:00:06+5:302015-12-21T23:01:13+5:30
उपाययोजना करा : जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी

त्र्यंबकरोडवरील अपघातांमुळे ग्रामस्थ त्रस्त
सातपूर : गेल्या वर्षभरात नाशिक-त्र्यंबकेश्वर रस्त्यावर (त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत) तब्बल ६० मोठे अपघात झाले असून, त्या अपघातांमध्ये ४६ जण गंभीर जखमी होऊन त्यांना अपंगत्व आले आहे, तर उर्वरित १४ जणांना आपला जीव गमवावा लागल्याचे उघडकीस आले आहे. हे अपघात थांबविण्यासाठी आणि वेगावर नियंत्रण आणण्यासाठी या रस्त्यावर ठिकठिकाणी गतिरोधक आणि पथदीप बसविण्याची मागणी रस्त्याच्या लगत असलेल्या गावांतील ग्रामस्थांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
त्र्यंबकेश्वर रस्ता चौपदरीकरण करून वर्ष झाले आहे. या रस्त्यावर होणारी वाहतूक दिवसेंदिवस वाढतच चाललेली आहे. तसेच या रस्त्यावर अनेक नामांकित महाविद्यालये, शिक्षणसंस्था असल्यामुळे हजारो विद्यार्थी तसेच कर्मचारी वर्ग, शिक्षक वर्ग त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात हॉटेल व्यवसाय असल्यामुळे मोठ्या प्रमाणात रहदारी वाढत आहे. हा रस्ता नवीन व मोठा असल्याने वाहनांच्या वेगावर मर्यादा नसते म्हणून या रस्त्यावर गेल्या वर्षभरात ६० मोठे अपघात आणि १४ जण मृत्युमुखी पडले आहेत. रस्त्यावर गतिरोधक नसल्यामुळे हे अपघात झालेले आहेत.
भविष्यात असे अपघात होऊ नयेत म्हणून या रस्त्यावर जेथे दुभाजक आहे व ज्या गावाकडे रस्ता वळतो अशा गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकण्यात यावेत व तेथे पथदीप बसविण्यात यावेत, अशी मागणी रमेश खांडबहाले, अॅण्ड. प्रभाकर खराटे, दीपक वाघ, कैलास चव्हाण, तुकाराम दाते, ज्ञानेश्वर मोरे, कैलास मोरे, राजू बदादे, शंकर चव्हाण, नामदेव चव्हाण, मधुकर खराटे, रामदास दाते, यशवंत महाले, काशीनाथ खेटरे, बाळासाहेब डगळे, श्याम ढगे, एकनाथ खांडबहाले, नवनाथ कोठुळे, उमेश मोरे, एकनाथ शिंदे आदि त्रिंबक विद्यामंदिर, वासाळी, बेळगावढगा, महिरावणी, तळेगाव, खंबाळा, वाढोली, बेझे, अंजनेरी, तळवाडे, पेगलवाडी या गावांतील सरंपच, उपसरंपच, ग्रापंचायत सदस्य, सर्व पक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांनी एकत्र येऊन जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. (वार्ताहर)