वडपाड्यात कुटुंबाला जातीबाहेर काढून मारहाण
By Admin | Updated: March 22, 2015 23:29 IST2015-03-22T23:28:41+5:302015-03-22T23:29:15+5:30
अभोणा पोलिसांचे दुर्लक्ष : पोलीस अधीक्षकांना निवेदन

वडपाड्यात कुटुंबाला जातीबाहेर काढून मारहाण
नाशिक : किरकोळ वादावरून कळवण तालुक्यातील वडापाडा (सुकापूर) येथील एका दळवी कुटुंबाला शिवीगाळ-मारहाण करून जातीबाहेर व गावाबाहेर काढून दिल्याची घटना घडली असून, पोलीस त्याकडे दुर्लक्ष करीत आहेत़ त्यामुळे त्रासलेल्या या दळवी कुटुंबाने संबंधित आरोपींवर कडक कारवाई करण्याबरोबरच समाजात परत घ्यावे यासाठी ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांना निवेदन दिले आहे़
याबाबत अधिक माहिती अशी की, कळवण तालुक्यातील वडपाडा (सुकापूर) येथे ८ मार्चला तमाशा आला होता़ त्यामध्ये नाचणे व थट्टामस्करीतून ज्ञानेश्वर जिवला दळवी, रमेश गोविंदा दळवी व लक्ष्मीबाई गोविंदा दळवी यांचा संशयित लक्ष्मण रामा दळवी, पोपट किसन दळवी, योगेश सखाराम दळवी, यशवंत भिका दळवी, बाळू हिराजी वाघेरे, दिनकर सीताराम पवार, मणिराम खंडू पारधी यांच्याशी वाद झाला़ संशयितांनी दळवी कुटुंबीयांना मारहाण करून गावाबाहेर काढून दिले़ तसेच यापुढे गावातील कोणाचाही मृत्यू असो की लग्न समारंभ यामध्ये कोणी दिसल्यास त्याला जिवे मारण्याची धमकी देण्यातयेत असे.
या घटनेनंतर दोन दिवसांनी गावात साखरपुड्याच्या कार्यक्रमास या दळवी कुटुंबातील पाच वर्षांची मुलगी जेवणासाठी गेली असता तिला गावाबाहेर काढून देत या कुटुंबाची माणसे गावात आलीच कशी, अशी विचारणा करून लक्ष्मीबाई दळवीस मारहाण केली़
यानंतर त्यांच्या घरातील रमेश व ज्ञानेश्वरला घराबाहेर काढून मारहाणही केली़ या मारहाणीची दळवी कुटुुंबाने ११ मार्चला अभोणा पोलिसांत तक्रार अर्जही दिला; मात्र पोलिसांनी कारवाई केली नाही़ पोलीस अधीक्षकांनीच लक्ष घालून न्याय मिळवून देण्याची विनंती दळवी कुटुंबाने केली आहे़ (प्रतिनिधी)