विजया राजाध्यक्षांचा आज जनस्थान पुरस्काराने सन्मान
By Admin | Updated: February 27, 2017 01:44 IST2017-02-27T01:44:36+5:302017-02-27T01:44:51+5:30
नाशिक : कुसुमाग्रज प्र्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा जनस्थान पुरस्कार डॉ. विजया राजाध्यक्ष यांना सोमवार (दि. २७) रोजी सायंकाळी ६ वाजता प्रदान करण्यात येणार आहे.

विजया राजाध्यक्षांचा आज जनस्थान पुरस्काराने सन्मान
नाशिक : मराठी साहित्यात मानाचा समजला जाणारा व कुसुमाग्रज प्र्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा जनस्थान पुरस्कार कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी मराठीतील ज्येष्ठ लेखिका डॉ. विजया राजाध्यक्ष यांना कुसुमाग्र्रज प्रतिष्ठानचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते सोमवार (दि. २७) रोजी महाकवी कालिदास कलामंदिर येथे सायंकाळी ६ वाजता प्रदान करण्यात येणार आहे.
विजया राजाध्यक्ष या मराठी साहित्यात चौफेर विषयावर लेखन करणाऱ्या म्हणून परिचित असल्या तरी त्यांचा मुख्य कल हा कथा लेखकाचा राहिला आहे. त्या स्त्रीवादी लेखिका व समीक्षक म्हणून परिचित असून, त्यांनी मुंबईच्या एल्फिन्स्टन महाविद्यालय व एसएनडीटी विद्यापीठात मराठीचे अध्यापन केले आहे. महाविद्यालयात शिक्षण घेत असतानाच त्यांनी आपल्या लेखनाला सुरुवात केली. त्यांची पहिली कथा स्त्री मासिकातून प्र्रसिद्ध झाली, तर ‘अधांतर’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह त्यानंतर विदेही, अनोळखी, अकल्पित, हुंकार आदिंसह १९ कथासंग्रह प्रकाशित झाले. त्यांच्या कथांमध्ये प्रामुख्याने मध्यमवर्गीय स्त्रीजीवनाचे चित्रण दिसून येते. विजया राजाध्यक्ष यांनी सन २000 मध्ये इंदूरमध्ये भरलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले असून, त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित रहावे, असे आवाहन कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.