रामकुंडावर राहणार खडा पहारा : मनपाची भूमिका
By Admin | Updated: April 1, 2017 20:40 IST2017-04-01T20:40:57+5:302017-04-01T20:40:57+5:30
महापालिकेने गोदावरी नदीपात्रासह गोदाघाटावरील प्रदूषण थांबविण्यासाठी उपाययोजना सुरू
रामकुंडावर राहणार खडा पहारा : मनपाची भूमिका
नाशिक : महापालिकेने गोदावरी नदीपात्रासह गोदाघाटावरील प्रदूषण थांबविण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या असून, पहिले तीन दिवस गोदापात्रात घाण-कचरा टाकू नये, यासाठी नागरिकांचे प्रबोधन केले जाणार आहे. त्यानंतर दि. ४ एप्रिलपासून प्रत्यक्ष दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची माहिती गोदावरी कक्षाचे प्रमुख रोहिदास दोरकुळकर यांनी सांगितले.
महापालिकेने गोदावरी नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी खास गोदावरी कक्ष स्थापित केला आहे. गोदापात्रात घाण-कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर दि. १ एप्रिलपासून दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी घेतला आहे. त्यानुसार, महापालिकेने शनिवार (दि.१) पासून कार्यवाहीला सुरुवात केली. पहिले तीन दिवस गोदाघाटावर तसेच गोदापात्रात घाण-कचरा टाकणाऱ्या नागरिकांचे प्रबोधन केले जाणार असून, त्यासाठी पाटबंधारे विभागामार्फत घाटावर ठिकठिकाणी माहिती-सूचना फलक उभारले जाणार आहेत. सुरुवातीला रामकुंड परिसराकडे लक्ष केंद्रित केले जाणार आहे.
रामकुंड परिसरात कपडे व वाहने धुण्यास मनाई करण्यात आलेली आहे, याशिवाय निर्माल्य टाकण्यासही बंदी घालण्यात आली आहे. पहिले तीन दिवस प्रबोधनावर भर राहणार आहे. त्यानंतर दि. ४ एप्रिलपासून गोदाघाटावर तसेच नदीपात्रात घाण-कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पहिल्या गुन्ह्यासाठी १ हजार रुपये तर परत तोच गुन्हा दुसऱ्यांदा केल्यास पाच हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. गोदावरी कक्षाचे प्रमुख रोहिदास दोरकुळकर यांनी पहिल्या दिवशी संबंधित खातेप्रमुखांसह रामकुंड परिसराचा आढावा घेतला. याठिकाणी महापालिकेचे सुमारे ५० कर्मचारी व सुरक्षा रक्षक तैनात ठेवण्यात येणार आहे