ठाणगाव शिवारात बिबट्याचे दर्शन
By Admin | Updated: June 4, 2016 22:51 IST2016-06-04T22:48:59+5:302016-06-04T22:51:25+5:30
परिसरात घबराट : युवकावर हल्ला

ठाणगाव शिवारात बिबट्याचे दर्शन
येवला : तालुक्यातील ठाणगाव शिवारात शेतकऱ्यांना शनिवारी दुपारच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन घटनास्थळी फटाके वाजवल्याने बिबट्या सैरावैरा धावत असताना परिसरातील नागरिकांच्या काळजाची धडधड वाढवत होता. घाबरलेल्या बिबट्याने गावातील एका तरु णावर हल्ला केला असून सदर तरु ण किरकोळ जखमी झाला आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी याठिकाणी पिंजरा लावला असून बिबट्याला पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
ठाणगाव शिवारात कॅनॉललगत असलेल्या माधव रखमाजी शेळके यांच्या राहत्या घराच्या पश्चिमेला गुरासाठी ठेवलेल्या गवताच्या खोंडाच्या बाजूला असलेल्या रस्त्याने गावातील युवक चालले होते. त्यांना गवताच्या भाऱ्यात काहीतरी हालचाल होत असल्याचे दिसले. त्यांनी जवळ जाऊन मागोवा घेण्याचा प्रयत्न केला असता त्यामधील एका युवकाला तेथे बिबट्याचे दर्शन झाले. त्याने तातडीने गावातील ग्रामस्थांना एकत्र करून माधव शेळके यांच्या गवताच्या खोंडाजवळ फटाके वाजविले. फटक्यांच्या आवाजाने घाबरलेला बिबट्या गवताच्या भाऱ्यातून बाहेर आला. पण जवळच एक हजार फुटावर असलेल्या दुसऱ्या गवताच्या खोंडात पळाला. यावेळी कृउबा माजी संचालक देवीदास शेळके यांनी तत्काळ वनविभागाला दूरध्वनीद्वारे कळविले. वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी येऊन पुन्हा फटक्याची आतषबाजी केल्याने घाबरलेल्या बिबट्याने या मार्गावरून गावाकडे जात असलेल्या संजय शिंदे या युवकावर हल्ला केला. या हल्ल्यात संजय शिंदे यांच्या मानेला व पोटाला किरकोळ जखमा झाल्या असून, त्यांना उपचारासाठी येवला ग्रामीण रु ग्णालयात दाखल केले आहे. (वार्ताहर)