रासायनिक गाळाने माशांचा बळी

By Admin | Updated: May 8, 2015 00:26 IST2015-05-08T00:25:36+5:302015-05-08T00:26:40+5:30

रंकाळा प्रदूषण : पंचनाम्यावर स्वाक्षरी करण्यास महापालिका प्रतिनिधीचा नकार

A victim of a chemical strain | रासायनिक गाळाने माशांचा बळी

रासायनिक गाळाने माशांचा बळी

कोल्हापूर : शहरात मंगळवारी (दि. ५) सायंकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे इराणी खणीतून काढलेल्या मूर्तींचा रासायनिक गाळ व परिसरातील सांडपाणी रंकाळ्यात मोठ्या प्रमाणात मिसळले. त्यामुळेच बुधवारी संध्यामठ परिसरात शिंपल्यासह हजारो मासे मृत झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रदूषण नियंत्रण मंडळाने केलेल्या पंचनाम्याच्या अहवालात नमूद केला. दरम्यान, या संयुक्त पाहणीनंतर मंडळाने केलेल्या पंचनाम्यावर महापालिकेच्या प्रतिनिधीने स्वाक्षरीस नकार दिला. रंकाळ्याबाबत गांभीर्य नसल्याने पर्यावरणप्रेमींतून संताप व्यक्त होत आहे.
रंकाळ्यात मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याची तक्रार विज्ञान प्रबोधिनीचे उदय गायकवाड यांनी मंडळाकडे केली. यानंतर मंडळाच्या अधिकारी व्ही. ए. कदम यांनी मत्स्य विभाग, महापालिकेचे पर्यावरण विभागप्रमुख आर. के. पाटील व गायकवाड यांच्यासह परिसराची पाहणी केली. रंकाळा परिसराची पथकाने बोटीद्वारे पाहणी केली. दूषित पाणी व रासायनिक घटकांचा प्रादुर्भाव झाल्याने संध्यामठ परिसरातच मासे मेल्याचे आढळून आले. बोटीतून फिरून विविध भागांतील पाण्याचे नमुने घेऊन ते रत्नागिरी येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. पाण्यातील आॅक्सिजनच्या प्रमाणाची तपासणी केली जाणार आहे. दरम्यान, महापालिकेच्या २५ कामगारांच्या पथकाने रंकाळ्यातील मेलेले मासे गोळा करून त्यांची विल्हेवाट लावली.
रंकाळ्याच्या पाण्याचा रंग पूर्णपणे हिरवा झाला आहे. देशमुख कॉलनी व श्याम सोसायटी नाल्यातील सांडपाण्याचा उपसा करणारी यंत्रणा बंद पडल्याने नाल्यातील दूषित पाणी रंकाळ्यात मिसळल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. शालिनी पॅलेस परिसरात सुरू असलेल्या बांधकामासाठी संध्यामठ परिसरातील २०० डंपर माती काढल्याने या परिसरात मोठ्या प्रमाणात शिंपले मरून पडले आहेत. इराणी खणीच्या बाजूने तटबंदी नसल्याने सांडपाण्यासह परिसरातील पाणी रंकाळ्यात मिसळत असल्याचा पंचनाम्यात नोंदविले.

विद्यापीठाची आज रंकाळा स्वच्छता मोहीम
कोल्हापूर : महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्यांच्या कोल्हापूर भेटीवेळी केलेल्या आवाहनानुसार आज, शुक्रवार सकाळी नऊ ते अकरा या वेळेत शिवाजी विद्यापीठातर्फे रंकाळा स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहीम पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. इराणी खण परिसरात राबविण्यात येणाऱ्या मोहिमेत जिल्हाधिकारी अमित सैनी, कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार आदींसह इतर शासकीय अधिकारी सहभागी होतील. विद्यापीठातील संशोधक विद्यार्थी, डॉ. आप्पासाहेब पवार विद्यार्थी भवनचे विद्यार्थी-विद्यार्थिर्नी, तंत्रज्ञान अधिविभागातील विद्यार्थी तसेच शहरातील विविध महाविद्यालयांतील सुमारे पाचशे विद्यार्थी आणि प्राचार्य, शिक्षक सहभागी होणार आहेत. दरम्यान, गुरुवारी सकाळी जिल्हाधिकारी सैनी यांनी त्यांच्या कार्यालयात आणि प्रभारी कुलगुरू डॉ. भोईटे यांनी विद्यापीठात आढावा बैठका घेतली. त्यात सर्व संबंधितांना सूचना केल्या.


‘जयंती’चे सांडपाणी थेट पंचगंगेत
जयंती नाल्यातील सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळत असल्याचे आणि ते रोखण्यासाठीची कोणतीही पर्यायी व्यवस्था कार्यान्वित नव्हती, ही बाब बुधवारी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आली. या सर्व घटनेचा मंडळाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला, परंतु पंचनाम्यावर मनपा अधिकाऱ्यांनी सही करण्यास नकार दिला. बुधवारी जयंती नाला हा बंधाऱ्यावरून वाहत होता. पाणी थेट नदीत मिसळत होते. क्लोरिनेशन सुरू होते, मात्र शास्त्रीय पद्धतीने होत नव्हते. पाहणीदरम्यान फक्त एकच पंप सुरू होता. बरेच प्लास्टिक नाल्यांतून वाहून गेले होते. नवीन पंपिंग स्टेशनच्या क्षमतेच्या डी.जी. सेटची अद्याप पूर्तता करण्यात आलेली नसून, जुना डी.जी. सेट पूर्णत: बंद होता, अशा नोंदी या पंचनाम्यात नोंदविण्यात आलेल्या आहेत. नाल्यातील सांडपाण्याचे नमुने तपासण्यासाठी घेतले. विशेष म्हणजे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकारी व्ही. ए. कदम, मनपाचे पर्यावरण अभियंता आर. के. पाटील, पर्यावरणप्रेमी दिलीप देसाई, आदींनी पाहणी केली.

Web Title: A victim of a chemical strain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.