हिंदूरक्षणासाठी विहिंपचा ‘अॅक्शन प्लॅन’
By Admin | Updated: August 29, 2015 00:04 IST2015-08-29T00:04:20+5:302015-08-29T00:04:46+5:30
हिंदूरक्षणासाठी विहिंपचा ‘अॅक्शन प्लॅन’

हिंदूरक्षणासाठी विहिंपचा ‘अॅक्शन प्लॅन’
नाशिक : देशातील हिंदूंच्या घटत्या लोकसंख्येवर उपायासाठी तसेच हिंदूरक्षणा- साठी विश्व हिंदू परिषद लवकरच ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करणार असून, याबाबत विहिंपच्या केंद्रीय मार्गदर्शन मंडळाची बैठक येत्या ५ सप्टेंबर रोजी त्र्यंबकेश्वरच्या जुन्या आखाड्यात होणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी पत्रकार परिषदेत दिली.
देशाला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा मुस्लिमांची लोकसंख्या ६ टक्के होती, ती आता १५ टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे, तर याउलट हिंदूंची लोकसंख्या ८७ टक्क्यांवरून ८० टक्क्यांवर आली आहे. या आकडेवारीचा एकूण विचार करता मुस्लिमांच्या लोकसंख्येत १७ टक्के वाढ झाली असल्याचा दावा तोगडिया यांनी केला.
या पार्श्वभूमीवर हिंदूंच्या रक्षणासाठी विहिंप पावले उचलणार असून, दि. ५ रोजी त्र्यंबकेश्वरला केंद्रीय मार्गदर्शन मंडळाची बैठक, तर दि. ६ सप्टेंबर रोजी तपोवनातील संत जनार्दन आश्रमात दुपारी २ ते ६ या वेळेत संत संमेलन होणार आहे. सदर बैठक तसेच संमेलनात हिंदू धर्मीयांच्या हितासाठी योजना तयार केल्या जाणार आहेत. हिंदूंच्या सुरक्षेसाठी देशभरात अभय कवच तयार करण्याच्या दृष्टीने चर्चा केली जाणार आहे.
संमेलनाला शेकडो साधू-महंत उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याद्वारे देशभरात हिंदूरक्षणाचा प्रसार-प्रचार केला जाणार असून, याबाबतचे नियोजन बैठकीत व संमेलनात केले जाणार आहे. देशात एक हजार वर्षांपासून हिंदू उपेक्षित असून, रोजगार, शिक्षण, विकासासाठी हिंदूंच्या एकतेची गरज असल्याचेही तोगडिया म्हणाले. यावेळी विहिंपचे व्यंकटेश आबदेव, चंदुभाई पटेल, विजय देशमुख, माधवदास राठी आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)