सीटकव्हर, मडफ्लॅपसाठी वाहनधारकांची गर्दी
By Admin | Updated: July 24, 2014 00:58 IST2014-07-24T00:38:10+5:302014-07-24T00:58:59+5:30
सीटकव्हर, मडफ्लॅपसाठी वाहनधारकांची गर्दी

सीटकव्हर, मडफ्लॅपसाठी वाहनधारकांची गर्दी
उपनगर : गेल्या दीड महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने आठवडाभरापासून शहर परिसरात दमदार हजेरी लावल्याने रस्त्यावरील प्लॅस्टिक सीटकव्हर, मडफ्लॅप विक्रेत्यांकडे वाहनधारकांची गर्दी होऊ लागली आहे.
गेल्या दीड महिन्यापासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे पावसाळ्यात उपयोगी ठरणाऱ्या वस्तूंची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांकडे ग्राहकांनीदेखील पाठ फिरवल्याने रस्त्यावरील विक्रेत्यांवर हातावर हात धरून बसण्याची वेळ आली होती. हंगामी व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना यामुळे आर्थिक चणचण भासू लागली होती. मात्र गेल्या आठवडाभरापासून शहर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावल्याने दुचाकी वाहनधारकांना विशेष काळजी घ्यावी लागत आहे. नाशिक-पुणे महामार्गावरील हंगामी व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांकडे स्वस्तात वस्तू मिळत असल्याने दुचाकीला प्लॅस्टिक सीटकव्हर, मडफ्लॅप, हॅँडल व पेट्रोल टाकीचे कव्हर बसवण्यासाठी वाहनधारकांची गर्दी झाल्याचे चित्र दिसत आहे. यामुळे हंगामी विक्रेत्यांची आर्थिक चणचण काही प्रमाणात दूर झाली आहे. (वार्ताहर)