वाहन शुल्क दरवाढीचा निषेध
By Admin | Updated: January 11, 2017 00:55 IST2017-01-11T00:54:42+5:302017-01-11T00:55:07+5:30
प्रादेशिक परिवहन कार्यालय : वाहनचालक, मालक संघटना

वाहन शुल्क दरवाढीचा निषेध
पंचवटी : केंद्रीय भूपृष्ठ व दळणवळण मंत्रालयाने आरटीओ संबंधित वाहनाच्या शुल्क वाढीत भरमसाठ वाढ करून सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. भरमसाठ केलेल्या या दरवाढीमुळे वाहनचालक तसेच मोटार ड्रायव्हिंग स्कूल व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. शासनाने केलेली दरवाढ मागे घ्यावी यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयात मंगळवारी सकाळी मोटार वाहनचालक मालक संघटना व मोटार ड्रायव्हिंग स्कूलचालकांनी निषेध नोंदवून प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. आरटीओच्या प्रवेशद्वारापासून वाहनचालक मालक संघटनेने सकाळी काही काळ काम बंद करून अधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत मोर्चा काढून निवेदन सादर केले. शासनाने जी दरवाढ केली आहे ती न परवडणारी आहे. तसेच दि. २९ डिसेंबर रोजी शासनाने परिपत्रक काढले होते, परंतु ते आरटीओ कार्यालयाला दोन दिवसांपूर्वी प्राप्त झाले. परंतु प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनासंबंधी कामासाठी ज्यादिवशी परिपत्रक प्रसिद्ध झाले त्यानुसारच शुल्क आकारणी केली जात आहे. शासनाने केलेली दरवाढ मागे घ्यावी यासाठी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी सुधाकर जाधव, मनोज जाधव, संजय निकम, अय्यास काझी, नितीन धामणे, ए. बी. पटेल, धनंजय साठे, राहुल चव्हाण आदिंसह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)