नाशिक : पितृपक्ष सुरू झाल्याने नैवेद्यासाठी लागणाऱ्या विविध भाज्यांची मागणी देखील वाढली आहे. त्यामुळे अळू, भेंडी, गवार, डांगर आदी
भाज्यांचे दर वाढण्यास सुरू झाली आहे. त्यातच गत आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील भाज्यांची नासाडी झाली आहे.
परिणामी आवक कमी आणि मागणी वाढल्याने भाज्यांचे दर वधारले आहेत. शहरातील बाजारपेठेत मेथी जुडी ५०, कोथिंबीर जुडी ४०, अळू जुडी
२५ रुपये, गवार १५० रुपये किलो, भेंडी ६० ते ७०, डांगर ५० रुपये किलो, कारले ५०, चवळी ६५, टोमॅटो २५, बटाटे २०, घेवडा ५०, वांगी
६० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे. मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने भाववाढ झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली. दर कोसळल्याने महिनाभरापूर्वी रस्त्यावर फेकून द्याव्या लागलेल्या भाजीपाल्याला आता चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.