महिला बालकल्याण सभापतिपदी वत्सला खैरे
By Admin | Updated: October 21, 2015 23:34 IST2015-10-21T23:31:33+5:302015-10-21T23:34:19+5:30
उपसभापती भामरे : अखेर कॉँग्रेसला सत्तापद

महिला बालकल्याण सभापतिपदी वत्सला खैरे
नाशिक : महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापतिपदी कॉँग्रेसच्या वत्सला खैरे आणि उपसभापतिपदी मनसेच्या शीतल भामरे यांची बिनविरोध निवड झाली. समितीवर महाआघाडीचे स्पष्ट बहुमत असल्याने शिवसेनेच्या उमेदवाराने माघार घेत बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा करून दिला. दीर्घकालावधीनंतर कॉँग्रेसला महिला बालकल्याण समितीच्या रूपाने सत्तापद लाभले आहे. यामुळे कॉँग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
विभागीय महसूल आयुक्तालयातील अपर आयुक्त रावसाहेब भागडे यांच्या अध्यक्षतेखाली सभापती-उपसभापतिपदासाठी निवडप्रक्रिया राबविण्यात आली. सभापती-उपसभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शिवसेनेच्या नंदिनी जाधव यांनी माघार घेतल्याने महाआघाडीच्या उमेदवार कॉँग्रेसच्या वत्सला खैरे यांची सभापतिपदी, तर मनसेच्या शीतल भामरे यांची उपसभापतिपदी निवड घोषित करण्यात आली.
समितीवर मनसे-३, राष्ट्रवादी-२, शिवसेना-२, कॉँग्रेस आणि भाजपा प्रत्येकी १ असे पक्षीय बलाबल आहे. महाआघाडीने दिलेल्या शब्दाला जागत कॉँग्रेसला सभापतिपदाची उमेदवारी जाहीर केली. समितीवर महाआघाडीचे संख्याबळ ६ असल्याने कॉँग्रेसच्या वत्सला खैरे व मनसेच्या शीतल भामरे यांची निवड निश्चित होती. सेनेने अपेक्षेप्रमाणे माघार घेतली.
निवडणूक प्रक्रियेच्या वेळी महाआघाडीच्या वत्सला खैरे, शीतल भामरे, शोभा आवारे, रुपाली गावंड, रत्नमाला राणे, मेघा साळवे तसेच शिवसेनेच्या नंदिनी जाधव आणि भाजपाच्या रंजना भानसी उपस्थित होत्या. समितीवरील एकमेव पुरुष सदस्य रिपाइंचे सुनील वाघ मात्र अनुपस्थित राहिले. वत्सला खैरे व शीतल भामरे यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी समितीचे सदस्य उपस्थित होते.
यावेळी मनसेचे शहराध्यक्ष राहुल ढिकले, सभागृहनेते सलीम शेख, गटनेते अनिल मटाले, विरोधी पक्षनेत्या प्रा. कविता कर्डक, कॉँग्रेसचे शहराध्यक्ष शरद अहेर, माजी मंत्री डॉ. शोभा बच्छाव, शिक्षण समितीचे सभापती संजय चव्हाण, डॉ. हेमलता पाटील, अश्विनी बोरस्ते, यशवंत निकुळे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)