वसाकाची ‘चिमणी’ पेटणार
By Admin | Updated: October 27, 2015 22:53 IST2015-10-27T22:52:26+5:302015-10-27T22:53:46+5:30
आशा : १६ कोटी ३२ लाख रु पयांचे कर्ज उपलब्ध

वसाकाची ‘चिमणी’ पेटणार
लोहोणेर : वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १६ कोटी ३२ लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले असून दोन वर्षांनंतर वसाकाची ‘चिमणी’ पुन्हा पेटणार असल्याने आगामी गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी व्यवस्थापनाला सहकार्य करावे, असे आवाहन बँकेचे संचालक तथा जि. प. चे कृषी व पशुसंवर्धन सभापती केदा आहेर यांनी केले.
वसाकाला जिल्हा मध्यवर्ती बँकेने अर्थसहाय्य उपलब्ध करून दिल्यानंतर दि. २७ रोजी संचालक आहेर यांनी कार्यस्थळावर पत्रकार परिषदेत बोलताना दोन वर्षांपासून गळीत हंगाम सुरू होऊ शकला नव्हता, त्यामुळे कामगारांना उपासमारीची वेळ आली होती.
ऊस उत्पादक संभ्रमावस्थेत होते. त्यातच राज्य सहकारी बँकेने कारखान्याचा ताबा घेतला. त्यामुळे वसाकाची चाके पुन्हा सुरू होतात की नाही याबाबत उलट-सुलट चर्चा होती.
कारखान्याची चाके चालू करण्यासाठी अल्पमुदतीचे १२ कोटी व मध्यम मुदतीचे ४ कोटी ३२ लाख असे १६ कोटी ३२ लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून घेतले आहे. सध्याची स्थिती पाहता कारखान्याचा आगामी गळीत हंगाम चालू करणे हे उद्दिष्ट आहे. कारखान्याची नाजूक स्थिती पाहता आगामी काळात कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांनी वसाकालाच ऊस पुरवठा करून सहकार्य करावे, असे आवाहन आहेर यांनी शेवटी केले. (वार्ताहर)