‘वसाका’ राज्य बॅँकेच्या ताब्यात
By Admin | Updated: October 8, 2015 00:07 IST2015-10-07T23:37:34+5:302015-10-08T00:07:18+5:30
मालमत्ता जप्त : थकीत कर्जापोटी कारवाई

‘वसाका’ राज्य बॅँकेच्या ताब्यात
लोहोणेर : तीन वर्षांपासून बंद असलेल्या व कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता अखेर बुधवारी उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये राज्य सहकारी बँकेने ताब्यात घेतली. पोलीस ताफ्यासह आलेल्या राज्य सहकारी बँकेच्या अधिकाऱ्यांना कर्मचारी, सभासदांनी जड अंतकरणाने कारखान्याचा ताबा दिला.
लोहोणेरनजीक असलेल्या विठेवाडी येथील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या थकीत कर्जामुळे राज्य सहकारी बँकेने याआधी दोनवेळा कारखान्याची मालमत्ता सील करण्याचा प्रयत्न केला होता. उच्च न्यायालयाने कारखान्याचा ताबा घेण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिल्याने (पान ७ वर)
तहसीलदार शर्मिला भोसले यांच्या उपस्थितीत सहकारी बँकेचे अधिकारी दुपारी १२ वाजता वसाका कार्यस्थळावर आले. प्रभारी कार्यकारी संचालक बी. डी. देसले, कामगार नेते अशोक देवरे यांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना कारखान्याचा ताबा बँकेला देत असलो तरी बँकेनेही कारखान्याला पुन्हा अर्थसहाय्य उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी कर्मचारी व सभासदांच्या वतीने केली. कारखान्याचे प्रशासक तथा शिखर बँकेच्या प्रादेशिक कार्यालयाचे विभागीय व्यवस्थापक राजेंद्र बकाल, आर.एच. पाटील, सहाय्यक व्यवस्थापक के.आर. वाघचौरे, आर.एस. रोकडे, वसुली अधिकारी एस. एस. अधिकारी, व्ही. एस. बागडे, एन.पी. पवार आदिंना तहसीलदार भोसले यांच्या हस्ते मालमत्तेचा ताबा देण्यात आला. उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन गुंजाळ, पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांच्यासह राज्य राखीव दलाच्या पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (वार्ताहर)