सेना-कॉँग्रेसच्या पुरस्कृतांना विभिन्न चिन्ह
By Admin | Updated: February 9, 2017 15:52 IST2017-02-09T15:52:35+5:302017-02-09T15:52:35+5:30
एकसमान चिन्हाची मागणी फेटाळली

सेना-कॉँग्रेसच्या पुरस्कृतांना विभिन्न चिन्ह
नाशिक : प्रभाग तीस हा महापालिकेच्या निवडणुकीत सध्या विविध कारणास्तव चर्चेत आहे. या प्रभागातून शिवसेना, भाजपा, कॉँग्रेस या प्रमुख पक्षांसह अपक्ष उमेदवारही निवडणूक रिंगणात आहे. सेना व कॉँग्रेसच्या पुरस्कृत उमेदवारांच्या पदरी बुधवारी (दि.८) निराशा पडली. कारण एकसमान निवडणूक चिन्ह देण्याची मागणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फे टाळून लावली. यामुळे सेनेकडून पुरस्कृत मात्र अपक्ष उमेदवारी करणाऱ्या चारही उमेदवारांना स्वतंत्र चिन्ह घेत प्रचार करावा लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
प्रभाग तीसमध्ये वडाळागाव, पांडवनगरी, कलानगर, राजीवनगर झोपडपट्टी, श्रध्दाविहार कॉलनी, जाखडीनगर आदि परिसर येतो. या प्रभागात अनुसूचित जाती (अ), नागरिकांचा मागासवर्ग महिला (ब), सर्वसाधारण महिला (क), सर्वसाधारण (ड) असे आरक्षण आहे. या प्रभागातून कॉँग्रेसच्या एकमेव अधिकृत उमेदवार रत्ना जय कोतवाल अनुसूचित जातीमधून तर भाजपाकडून सुप्रिया खोडे, सतीश सोनवणे, श्याम बडोदे, दीपाली कुलकर्णी हे चार उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेनेच्या एकाही उमेदवाराच्या अर्जासोबत पक्षाचे एबी फॉर्म नसल्यामुळे संजय चव्हाण, रशिदा शेख, नीलेश चव्हाण, शकुंतला खोडे यांना अपक्ष म्हणून अनुक्रमे पाण्याचा जग, चहाची किटली, पाटी, नारळ असे वेगवेगळे निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले आहे. यामुळे शिवसेनेला मोठा हादरा बसला असून, एकसमान चिन्हाची मागणीदेखील फेटाळून लावण्यात आल्याने या पुरस्कृत उमेदवारांना अपक्ष म्हणूनच निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहे. राष्ट्रवादी व कॉँग्रेस या पक्षांचीदेखील थोड्याफार फरकाने अशीच अवस्था असून, राष्ट्रवादीच्या पुरस्कृत उमेदवार आशाबी शेख यांच्याही उमेदवारी अर्जात त्रुटी आढळल्याने त्यांनाही अपक्ष म्हणून अंगठी या निवडणूक चिन्हाद्वारे निवडणूक लढवावी लागणार आहे. तसेच कॉँग्रेसकडून पुरस्कृत असलेले शाह नवाब अकबर यांचाही अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अपक्ष म्हणून स्वीकारल्याने त्यांना बॅट या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. एकूणच शिवसेना व कॉँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या अर्जांमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांना धनुष्यबाण व हाताचा पंजा या राष्ट्रीय निवडणूक चिन्हांना मुकावे लागले आहे.