वणीत खंडित वीजपुरवठा
By Admin | Updated: May 19, 2016 00:23 IST2016-05-18T23:37:33+5:302016-05-19T00:23:05+5:30
वणीत खंडित वीजपुरवठा

वणीत खंडित वीजपुरवठा
वणी : सुरगाणा तालुक्यातील विद्युतपुरवठा तांत्रिक कारणामुळे खंडित झाल्याने वणीच्या विद्युत उपकेंद्रातून बॅकअप पद्धतीने हा विद्युतपुरवठा वितरण कंपनीने सुरू केल्याने वणी परिसरात वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले असून, वणीतील वीज ग्राहकांची ‘कथा कुणाची, व्यथा कुणाला’ अशी स्थिती झाली आहे.
मागील आठवड्यात दिंडोरी तालुक्यातील पिंपरखेड परिसरात वादळी पावसामुळे प्रमुख विद्युतवाहिनीचे ३३/११ केव्हीचे तीन खांब जमीनदोस्त झाल्याने पिंपरखेड- कोशिबा ३३/११ केव्ही, करंजखेड फाटा ३३/११ के व्ही, बोरगाव ३३/११ केव्ही, सुरगाणा ३३/११ केव्ही या उपकेंद्रांतून सुरगाणा तालुक्यात होणारा विद्युतपुरवठा खंडित झाला. यामुळे विद्युत उपकरणांवर प्रतिकूल परिणाम होऊन त्याचा फटका घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक, शेती इ. वीजग्राहकांना बसतो. याबाबत पिंपरखेड परिसरातील प्रमुख विद्युतवाहिनीचे खांब उभे करून दुरुस्तीचे काम सुरू असल्याची माहिती देण्यात आली. मात्र संथगतीने सुरू असलेल्या कामामुळे वणी वीज उपकेंद्राच्या तांत्रिक अडचणी उभ्या राहण्याची शक्यता उभी ठाकली आहे. त्यात वणीचे अधिकारी मुख्यालय सोडून नाशिकला वास्तव्यास आहेत. वीज कर्मचाऱ्याशी भ्रमणध्वनीवर संपर्कात राहून कारभार आॅनलाइन हाकण्याच्या शोधसेवेमुळे वीज ग्राहक पुरते वैतागलेले असताना, वणी उपकेंद्रावर अतिरिक्त दाबाची समस्या उभी राहिल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याचा सूर उमटतो आहे. (वार्ताहर)