नाशिक : गेल्या काही दिवसांपासून वानरांची एक जोडी शहरातील ठिकठिकाणी दिसून येत असून, त्यामुळे चिमुकल्यांची करमणूक होत असली तरी या वानरांच्या जोडीने आज गोदावरी नदीवरील होळकर पुलावर गोंधळ घालत वाहतूक जाम केली. काही दिवसांपूर्वी गोल्फ क्लब मैदानावर वानरांची जोडी आली असता काही टवाळखोर तरुणांनी त्यांच्यावर दगडांचा वर्षाव केला. त्यामुळे या जोडीची ताटातूट होऊन एक वानर गोल्फ क्लब मैदानावरील झाडावर तर दुसरे चांडक सर्कलच्या दिशेने पळाले. त्यानंतर दोन-तीन दिवसांनी वानराची जोडी प्रमोद महाजन उद्यानात आली आणि तेथे उपस्थित चिमुकल्यांची चांगलीच करमणूक झाली. यावेळी वानर उद्यानातील खेळणीवर बसले. त्यामुळे काही काळ चिमुकल्यांना खेळणीचा आनंद लुटता आला नाही. दरम्यान, पुन्हा ही जोडी दुपारी चारच्या सुमारास गोदावरी नदीवरील होळकर पुलावर अवतरली. नेहमी वर्दळीचा रस्ता असल्याने ही वानरे रस्त्याच्या मधोमध जाऊन पोहोचली. दोन्ही बाजूंच्या वाहतुकीमुळे गोंधळून या वानरांनी उड्या घेत रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्त्याच्या दोन्ही कडेने खोल नदीपात्र असल्याने ते अधिकच गोंधळले आणि बराच वेळ केवळ रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे वाहतूक खोळंबली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पुलावर काय झाले, यावरून उलटसुलट चर्चेलाही उधाण आले होते. काही वेळाने वानरांना पुलाच्या एका टोकावरून बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला आणि वाहनचालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. वानरांच्या या प्रकारामुळे काहींची करमणूक झाली तर काहींना मनस्ताप सहन करावा लागला.
वानरजोडीने केला होळकर पूल जाम
By admin | Updated: May 7, 2014 22:19 IST