कुंभस्नानासोबत सेवेचा भाव महत्त्वाचा
By Admin | Updated: December 21, 2015 22:58 IST2015-12-21T22:56:53+5:302015-12-21T22:58:56+5:30
संविदानंद सरस्वती : अग्रवाल सभेच्या कुंभ दर्पण पुस्तिकेचे प्रकाशन

कुंभस्नानासोबत सेवेचा भाव महत्त्वाचा
नाशिक : कुंभ पर्वात स्नानाचे जसे महत्त्व आहे तसा सेवा, सद्भावना, सत्कार्य व धर्मकार्याला पुढे नेण्याचा भावही महत्त्वाचा असून त्याचाच आरसा ‘कुंभ दर्पण’च्या माध्यमातून सर्वांसमोर ठेवण्यात आल्याचे गौरवोद्गार कैलास मठाचे आचार्य स्वामी संविदानंद सरस्वती यांनी काढले.
कुंभमेळ्यातील शाहीस्नानाच्या पर्वणी दरम्यान अग्रवाल सभेतर्फे करण्यात आलेल्या अन्नछत्रादी विविध सेवा कार्यावर आधारित ‘कुंभ दर्पण’ पुस्तिकेचे प्रकाशन निर्माण हाऊसच्या सभागृहात स्वामी संविदानंद सरस्वती व प्रख्यात रामायणकार विजय कौशलजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी अग्रवाल सभेचे अध्यक्ष नेमीचंद पोद्दार होते. नाशिक सेवा समितीचे संरक्षक ब्रिजलाल धूत, अग्रवाल समाजाचे विभागीय अध्यक्ष ताराचंद गुप्ता, जिल्हाध्यक्ष श्याम ढेडिया आदि यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सदर पुस्तिका ही केवळ दर्पण नसून कुंभाचे दर्शन घडविणारीही असल्याचे याप्रसंगी विजय कौशलजी महाराज यांनी सांगितले. विमल सराफ, राजेश पारीख, सपना अग्रवाल आदिंनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक किरण अग्रवाल यांनी, तर सूत्रसंचालन दीपक अग्रवाल यांनी केले. आभार महेश अग्रवाल यांनी मानले.