उत्तमराव ढिकले यांचे निधन
By Admin | Updated: April 8, 2015 01:51 IST2015-04-08T01:51:05+5:302015-04-08T01:51:28+5:30
उत्तमराव ढिकले यांचे निधन

उत्तमराव ढिकले यांचे निधन
नाशिक : राजकारण, सहकार आणि समाजकारणातील अग्रणी आणि नाशिकचे माजी खासदार, आमदार तसेच महापौर अशी अनेक पदे भूषविणारे अॅड. उत्तमराव नथूजी ढिकले यांचे मंगळवारी दुपारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते.
गेल्या रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घरीच असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर त्यांना कॉलेजरोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुरुवातीला गंभीर असलेली त्यांची प्रकृती काहीशी सुधारल्याचे सांगितले जात होते. तथापि, ही प्रकृतीतील सुधारणा अल्पकाळ टिकली. दोन दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेरीस मंगळवारी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली. सार्वजनिक जीवनात अखेरपर्यंत सक्रिय असलेल्या ढिकले यांच्या अचानक झालेल्या निधनामुळे त्यांच्या समर्थकांना धक्का बसला. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच समर्थकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. त्यानंतर पंचवटीतील ‘पार्वती निवास’ या त्यांच्या निवासस्थानी पार्थिव ठेवण्यात आले होते. तेथे त्यांचे समर्थक आणि आप्तेष्टांनी गर्दी केली होती. सर्वच क्षेत्रात वावर असल्याने ढिकले यांच्या निवासस्थानी जमलेल्या सर्वांनाच अश्रू अनावर झाले होते. महापौर अशोक मुर्तडक, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रकाश वडजे, म्हाडाचे माजी विभागीय संचालक नरेंद्र दराडे, अॅड. संदीप गुळवे, राजेंद्र डोखळे, परवेज कोकणी, राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद सभापती केदा अहेर, डॉ. प्रदीप पवार, मनसेचे जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे यांनी ढिकले यांच्या निवाससस्थानी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले आणि श्रद्धांजली अर्पण केली.ढिकले यांच्या पश्चात तीन मुलगे, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मनसेचे शहराध्यक्ष तथा स्थायी समितीचे माजी सभापती अॅड. राहुल ढिकले, तसेच मविप्रचे चिटणीस व नासाकाचे संचालक डॉ. सुनील ढिकले यांचे ते वडील, तर महापालिकेचे शहर अभियंता सुनील खुने यांचे श्वशुर होते.