‘राहू-केतू’च्या वक्रदृष्टीवर पितृपक्षात ‘उतारा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:16 IST2021-09-24T04:16:50+5:302021-09-24T04:16:50+5:30
मुळात शासकीय सेवेत शुभ-अशुभ असे कधी नसतेच, असते ते फक्त कर्तव्य व जबाबदारीचे पालन. त्यामुळे नवीन सेवेत दाखल झालेल्यांना ...

‘राहू-केतू’च्या वक्रदृष्टीवर पितृपक्षात ‘उतारा’
मुळात शासकीय सेवेत शुभ-अशुभ असे कधी नसतेच, असते ते फक्त कर्तव्य व जबाबदारीचे पालन. त्यामुळे नवीन सेवेत दाखल झालेल्यांना कर्तव्य व जबाबदारीचे पालन करताना पितृपक्ष हा शुभ कार्यासाठीच असतो याची जाणीव करून देण्याची वेळ येणार नाही, असे मानावयास हरकत नाही. असो. खरे तर अनुकंपा तत्त्वावरील या उमेदवारांवरील नोकरीचे ‘विघ्न’ गणेशोत्सवाच्या काळातच दूर होणे अपेक्षित होते; परंतु तत्पूर्वीच जिल्हा परिषदेवर अगोदर अनुसूचित जमाती कल्याण समिती व त्यानंतर पंचायत राज समितीच्या ‘राहू-केतू’ची वक्रदृष्टी पडली व महिनाभर प्रशासनाला ‘अंधश्रद्धे’च्या जोखडात जखडून ठेवले. अनेक ग्रह-ताऱ्यांची समजूत काढताना जी काही प्रशासनाची दमछाक झाली ते पाहता, पुण्यकर्माची तशीही आवश्यकता असल्याची अंधश्रद्धा जोपासणाऱ्यांसाठी अनुकंपा कर्मचाऱ्यांचे पुण्य पदरात पडले आहे. अर्थात श्रद्धा-अंधश्रद्धा ही देखील प्रत्येकाची खासगी भावना आहे. त्यामुळे वाऱ्याच्या व दिशेच्या प्रेमात पडून आपल्या खुर्च्या-टेबलाची दिशा गुपचूप बदलून घेण्याची अंधश्रद्धा बाळगणाऱ्यांसाठी पितृपक्षाचा हा काळ तसाही अशुभच. मात्र, प्रशासनाने या साऱ्या गोष्टींना मूठमाती देत आपले ‘पुण्य’कर्म कायम ठेवले आहे. गेल्या वर्षीही प्रशासनाने तब्बल शंभराहून अधिक अनुकंपा तत्त्वावरील उमेदवारांना सेवेत सामावून घेतले. एकाच दिवशी उमेदवारांची शैक्षणिक गुणवत्तेवर निवड व रिक्त जागांवर समुपदेशनाने नियुक्ती देऊन उमेदवारांची व प्रशासनाची सोय या निमित्ताने पाहिली गेली. पारदर्शीपणे राबविण्यात आलेल्या या प्रक्रियेबाबत अजून तरी कोणतीही तक्रार वा ओरड झालेली नाही. तशी होणार नाही, याची खात्री उपरोक्त पद्धतीच्या वापराने होईल असे वाटत असले तरी, अशी तक्रार भविष्यात झालीच तर अनुकंपावरील नेमणुकीला पितृपक्षाचा ‘बोल’ लावण्यास तुम्ही-आम्ही मोकळेच.
- श्याम बागूल