वाहने धुण्यासाठी पाण्याचा वापर
By Admin | Updated: October 23, 2015 00:34 IST2015-10-23T00:34:04+5:302015-10-23T00:34:35+5:30
वाहने धुण्यासाठी पाण्याचा वापर

वाहने धुण्यासाठी पाण्याचा वापर
नाशिक : महापालिकेने गंगापूर धरणातील कमी पाणीसाठा लक्षात घेऊन शहरात पाणीकपात लागू केली; परंतु विजयादशमीच्या प्रभातसमयी घरीदारी सर्व्हिस स्टेशन तयार होत वाहने धुण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करण्यात आला. त्यामुळे रस्त्यांवर ‘पाणीकपात’ अक्षरश: ओसंडून वाहताना दिसून आली. पाण्याचा अपव्यय करणाऱ्यांवर दंडात्मक तरतुदीची भाषा करणारी महापालिका मात्र विजयादशमीला पाण्याची ही ‘लयलूट’ थांबवू शकलेली नाही. गंगापूर धरणात यंदा ७० टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने येत्या उन्हाळ्यात पाणीसंकट ओढवू नये म्हणून महापालिकेने दि. ९ आॅक्टोबरपासून शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार काही भागात सकाळी, तर काही ठिकाणी सायंकाळी पाणीपुरवठा केला जात आहे. याशिवाय, अंगणात सडा टाकणे, वाहने धुणे, थेट नळाला मोटर लावून पाण्याचा उपसा करणे, तळटाक्या किंवा इमारतींवरील टाक्या ओव्हरफ्लो होणे आदि माध्यमातून पाण्याचा गैरवापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पहिल्यावेळी पाण्याचा गैरवापर करताना आढळून आल्यास ५०० रुपये, तर पुन्हा दुसऱ्यांदा तोच प्रकार घडल्यास १००० रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे. गुरुवारी विजयादशमीला पहाटेपासूनच महापालिकेच्या पाणीकपातीच्या धोरणाचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. घरीदारी, सोसायट्यांच्या पार्किंगमध्ये सर्रासपणे नळाला पाईप लावून वाहने धुण्याचे प्रकार दिसून आले.