चारसूत्री भात लागवडीचा प्रयोग
By Admin | Updated: October 25, 2016 00:34 IST2016-10-25T00:33:42+5:302016-10-25T00:34:03+5:30
इगतपुरी : वासाळी, बारशिंगवे येथे जलयुक्त शिवार अभियानाचा आधार

चारसूत्री भात लागवडीचा प्रयोग
लक्ष्मण सोनवणे बेलगाव कुऱ्हे
भाताचे माहेरघर म्हणून परिचित असलेल्या इगतपुरी तालुक्यात हवामान बदलाचे मोठे आव्हान शेतकऱ्यांपुढे उभे राहिले असताना महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानातून अडविण्यात आलेल्या पाण्याने व शेततळ्यांतून वासाळी, बारशिंगवे येथील शेतकऱ्यांनी चारसूत्री हा नवीन भातशेतीचा प्रयोग यशस्वी केला आहे. आगामी दिवाळीच्या आठवडाभरात सोंगणीला वेग येणार असून, भातशेतीतून उत्पादनदेखील चांगले मिळणार असल्याने आदिवासी शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बारशिंगवे परिसरात भात कापणी सुरू झाली आहे. मजूर खर्च परवडत नसल्यामुळे येथील शेतकरी वसंत बोराडे, शिवाजी बोराडे, पांडुरंग बोराडे, गुलाब भले, कैलास भले, गोविंद लहांगे यांनी यंत्राच्या साहाय्याने भात कापणी सुरू केली आहे. मंडल कृषी अधिकारी अरुण पगारे, कृषी सहायक रणजित आंधळे त्यांना विशेष मार्गदर्शन करीत आहेत. मुबलक पाऊस; परंतु खडकाळ जमिनीमुळे तालुक्यातील वासाळी येथे कायमच दुष्काळी स्थिती असते. अशात शेतकरी धास्तावले होते. गेल्या चार वर्षात पावसाचे स्वरूप, उपलब्ध पाणीसाठा यावर अवलंबून शेतीवर मोठा विपरीत परिणाम होताना दिसत होता. भाताचे माहेरघर म्हणून अग्रेसर असलेल्या तालुक्यात नैसर्गिक बदलाच्या समस्या आ वासून उभ्या असताना शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानाच्या संयोगाने व शेततळे झाल्यामुळे पाण्याचा उपयोग शेतकऱ्यांना झाला. शेती संशोधन तंत्रज्ञानात झपाट्याने प्रगती होत असताना पावसावर अवलंबून असलेल्या भातशेतीसाठी दुष्काळी स्थितीमध्ये जलयुक्त शिवारातील सीमेंट काँक्रीट बंधारे शेतकऱ्यांना फायद्याचे ठरले. भातशेतीला पर्यायी व्यवस्था निर्माण करून आधुनिक पीकपद्धत राबविण्यासाठी शेतकऱ्यांना मोठे यश मिळाले आहे. तालुक्यात शेतकऱ्यांना खरीप हंगामात भातशेती करण्यासाठी तालुका कृषी विभागाकडून चारसूत्री भात तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आल्याने अडचणीत असणाऱ्या शेतकऱ्यांना पीकपद्धती, खते, सेंद्रीय शेतीबाबत जनजागृती म्हणून प्रत्येक गावात मार्गदर्शन करण्यात आले होते. काही दिवसांपूर्वी पिके हातातोंडाशी आलेली असताना हवामानातील बदलामुळे संघर्ष करावा लागत होता; मात्र तालुक्यात संपूर्णपणे पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना जलयुक्त शिवारामुळे मोठी मदत मिळाली. कृषिक्षेत्रात नवनवीन संशोधनाच्या माध्यमातून तळागळातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचे धडे आत्मसात करण्यासाठी तालुका कृषी विभागाकडून जनजागृतीसारखे उपक्रम राबवून त्यांच्या नसानसात वेगवेगळे प्रयोग करण्याची ताकद भरली जात आहे. (वार्ताहर)
भात लागवडीत अग्रेसर असलेल्या इगतपुरी तालुक्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर भात शेतीचे नवनवीन प्रयोग यशस्वी झाले आहेत. तालुक्यात वाड्या व वस्त्यांमधील शेतकरी भात, नागली, वरई, सोयाबीन आदि पिके घेतात. मजुरांची तसेच पाण्याची उपलब्धता, जमिनीचा प्रकार, बाजारपेठेची मागणी आणि उत्पादन खर्च या सर्व गोष्टींचा विचार करून शेतकऱ्यांनी भात लागवडीच्या सुधारित पद्धतीचा अवलंब केल्यास भात शेतीमध्ये शाश्वती येऊ शकते. शेतीमध्ये बदलत्या काळानुसार नवनवीन बदल होत आहेत. मनुष्यबळ कमी असल्यास अशा आधुनिक पद्धतीचा अवलंब करता येणे फायद्याचे आहे. यासाठी गावागावात कृषी विभागाचे कर्मचारी मार्गदर्शनासाठी आहेत. मागील वर्षी उत्पादनात मोठी घट निर्माण झाली होती. या वर्षी उत्पन्नदेखील चांगले मिळण्याची चिन्हे दिसत असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले आहे.
सध्याची हवामान स्थिती, साधनसामग्रीची उपलब्धता आणि शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानातून बांधण्यात आलेले बंधारे, शेततळे यामुळे तालुक्यात भातलागवडीत प्रयोगशील चारसूत्री भातपद्धतीचा यशस्वी अवलंब करण्यात आला आहे. योग्य मार्गदर्शनाने आणि भातशेतीच्या आधुनिक प्रयोगाने शेतकऱ्यांना या वर्षी चांगले उत्पन्न मिळणे शक्य आहे. - संजय शेवाळे, कृषी अधिकारी