उर्दूचा गोडवा : शायर, साहित्यिकांकडून ‘बज्म-ए-अरबाब-ए-सुखन’ची स्थापना
By Admin | Updated: March 3, 2015 00:36 IST2015-03-03T00:36:13+5:302015-03-03T00:36:22+5:30
विस्तारणार उर्दू साहित्याचे अवकाश

उर्दूचा गोडवा : शायर, साहित्यिकांकडून ‘बज्म-ए-अरबाब-ए-सुखन’ची स्थापना
नाशिक
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांचे गाव असा लौकिक असणाऱ्या नाशिकमध्ये आता उर्दू साहित्याचे अवकाश विस्तारणार आहे. शहरासह जिल्ह्यातील उर्दू कवी (शायर), साहित्यिकांनी एकत्र येऊन उर्दू साहित्याशी संबंधित अशा ‘बज्म-ए-अरबाब-ए-सुखन’ या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली असून, आता नाशिककरांना उर्दू साहित्याचा गोडवा मुशायरासारख्या मैफलीतून अनुभवता येणार आहे.
ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक वारसा असलेले शहर म्हणून नाशिकची ओळख आहे. या शहराला साहित्य-सांस्कृतिक वारसा आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी तसेच उर्दू भाषेवरही बहुसंख्य नाशिककर प्रेम करतात. मराठी, हिंदी भाषांच्या विकासासाठी तसेच या भाषांमधील दिग्गज साहित्यिकांचे साहित्य, विचार नागरिकांपर्यत पोहचावेत यासाठी मराठी-हिंदी काव्यसंमेलने, व्याख्याने आयोजित केले जातात. उर्दू मुशायरा, गझल मैफली अपवादानेच आयोजित केल्या जातात.
या पार्श्वभूमीवर या संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. संस्थेच्या माध्यमातून शहरात उर्दू कवी संमेलन (मुशायरा), गझलीच्या मैफली, उर्दू शायरीचा विकासाबाबत उर्दू शिकणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन आदि उपक्रम राबविणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष शायर रईसा खुमार यांनी दिली आहे. एकूणच गुलशनाबादेत उर्दू साहित्याचे अवकाश विस्तारणार असून, या भाषेमधील गोडव्याचा आनंद नाशिककरांना वेळोवेळी लुटता येणार आहे. उर्दू साहित्य चळवळीची जोपासना तसेच उर्दू भाषेमधील अर्थपूर्ण शायरी नागरिकांना ऐकावयास मिळणार आहे. (वार्ताहर)