बदली झाल्यानंतर आयुक्तांच्या सहीने पदोन्नत्या वादग्रस्त : शहर अभियंत्यांसह अन्य दोघांची पदस्थापना
By Admin | Updated: May 31, 2014 00:37 IST2014-05-31T00:14:46+5:302014-05-31T00:37:37+5:30
नाशिक : महापालिकेचे वादग्रस्त आयुक्त संजय खंदारे यांची महिनाभरापूर्वी बदली झाली खरी; परंतु त्यांच्या बदलीनंतर महिनाभराने म्हणजेच गेल्या मंगळवारी पालिकेतील शहर अभियंता, अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता अशा तिघांच्या पदोन्नत्या झाल्याचे प्रकरण उघड झाले आहे. तथापि, खंदारे यांनी यापूर्वीच आपली पदस्थापना केली होती; परंतु पदोन्नतीचे आदेश आचारसंहितेनंतर आता निर्गमित झाल्याचा दावा संबंधित अधिकार्यांनी केला आहे.

बदली झाल्यानंतर आयुक्तांच्या सहीने पदोन्नत्या वादग्रस्त : शहर अभियंत्यांसह अन्य दोघांची पदस्थापना
नाशिक : महापालिकेचे वादग्रस्त आयुक्त संजय खंदारे यांची महिनाभरापूर्वी बदली झाली खरी; परंतु त्यांच्या बदलीनंतर महिनाभराने म्हणजेच गेल्या मंगळवारी पालिकेतील शहर अभियंता, अधीक्षक अभियंता आणि कार्यकारी अभियंता अशा तिघांच्या पदोन्नत्या झाल्याचे प्रकरण उघड झाले आहे. तथापि, खंदारे यांनी यापूर्वीच आपली पदस्थापना केली होती; परंतु पदोन्नतीचे आदेश आचारसंहितेनंतर आता निर्गमित झाल्याचा दावा संबंधित अधिकार्यांनी केला आहे.
महापालिकेचे वादग्रस्त आयुक्त संजय खंदारे यांनी आचारसंहिता कालावधीत अनेक वादग्रस्त निर्णय घेतल्याने त्यांची बदली राज्य शासनाने केली होती. गेल्या महिन्यात ही बदली झाली असली, तरी गेल्या २७ मे रोजी पालिकेतील तीन वरिष्ठ अधिकार्यांना पदोन्नती दिल्याचे आज उघड झाले. विशेष म्हणजे, सध्या प्रभारी आयुक्त म्हणून संजीवकुमार कामकाज बघत आहेत. अधीक्षक अभियंता असलेले सुनील खुने यांच्याकडे प्रभारी कार्यभार होता. त्यांना शहर अभियंता पदावर पदस्थापना देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कार्यकारी अभियंता उत्तम पवार यांच्याकडे अधीक्षक अभियंता पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. त्यामुळे त्यांना अधीक्षक अभियंतापदी पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला, तर नगररचना विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संजय घुगे हे उपअभियंता असल्याने त्यांनाही पदोन्नती देण्यात आली आहे. या सर्वांचे आदेश २७ मे रोजी संजय खंदारे यांच्या स्वाक्षरीने निर्गमित झाले आहेत. त्यास शहर विकास आघाडीचे नगरसेवक संजय चव्हाण यांनी आक्षेप घेतला आहे. अधिकार्यांच्या पदोन्नतीविषयी दुमत नाही; मात्र सध्या आयुक्त संजीवकुमार असताना आदेश खंदारे यांच्या सहीने कसे निघाले, असा प्रश्न त्यांनी केला आहे. दोन वर्षांपूर्वी पदोन्नती समितीची बैठक झाली तेव्हा शासनाच्या मान्यतेनंतरच पदोन्नत्या देण्याचे इतिवृत्तात नमूद आहे; परंतु खंदारे यांनी शासन आदेशाला अधिन राहून अगोदरच पदोन्नती दिल्याचे चव्हाण यांचे म्हणणे आहे. दरम्यान, संबंधित अधिकार्यांनी मात्र पदोन्नती नियमानुसारच असून, केवळ आचारसंहितेमुळे खंदारे यांच्या स्वाक्षरीनिशी रखडलेले पदोन्नतीचे आदेश आता निर्गमित करण्यात आले आहेत, असे सांगितले.