उपेंद्रनगर बसथांबा ओस
By Admin | Updated: December 23, 2015 22:11 IST2015-12-23T22:08:53+5:302015-12-23T22:11:02+5:30
गैरसोय : नाशिकरोडसाठी बस सुरू करण्याची मागणी

उपेंद्रनगर बसथांबा ओस
नाशिक : नाशिकरोड ते उत्तमनगरपर्यंत अनेक बसेस येतात, परंतु उपेंद्रनगर बसथांब्यावर बसच येत नसल्याने प्रवाशांची गैरसौय होत असून बसथांबा ओस पडला आहे. नाशिकरोड-उपेंद्रनगर चक्रीमार्ग बससेवा सुरू करावी, अशी मागणी साहित्यसम्राट अण्णा भाऊ साठे ज्येष्ठ नागरिक, शैक्षणिक, सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
सहावी योजना, सिडको परिसर, माणिकनगर, उपेंद्रनगर या परिसरात बस थांबा असून येथे अण्णा भाऊ साठे ज्येष्ठ नागरिक शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने पंचवटी आगार अंतर्गत बसेसचे वेळापत्रक लावण्यात आलेले आहे. नाशिकरोडहून उत्तमनगरपर्यंत बसेस येतात. परंतु त्या बस उपेंद्रनगरपर्यंत घेऊन जाण्याची तसदी बसचालक घेत नाहीत. या ठिकाणी लावण्यात आलेल्या वेळापत्रकात उपेंद्रनगर ते नाशिकरोड, पेठरोड, म्हसरूळ, अशोकस्तंभ व आडगाव या जाणाऱ्या बसेसचा समावेश आहे. परंतु नाशिकरोड ते उपेंद्रनगर येथे एकही बस आजपर्यंत आलेली नाही. नाशिकरोड येथे जाणाऱ्या बसची उपेंद्रनगर, माणिकनगर, या परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर आतुरतेने वाट पाहत असतात. परंतु या ठिकाणी बसच येत नसल्याने प्रवाशांना उत्तमनगरपर्यंत पायपीट करावी लागते.