बोगस मतदान टाळण्यासाठी करणार अद्ययावत याद्या

By Admin | Updated: September 21, 2014 00:41 IST2014-09-20T20:42:36+5:302014-09-21T00:41:32+5:30

बोगस मतदान टाळण्यासाठी करणार अद्ययावत याद्या

Updating lists will not prevent bogus voting | बोगस मतदान टाळण्यासाठी करणार अद्ययावत याद्या

बोगस मतदान टाळण्यासाठी करणार अद्ययावत याद्या


नाशिक : मतदार यादीत नाव आहे परंतु राहत्या पत्त्यावर न आढळून येणाऱ्या मतदारांबरोबरच ज्यांनी स्थलांतर केले व मयत झाले अशा मतदारांचा घरोघरी जाऊन शोध घेऊन त्यांच्या नावापुढे शिक्का मारून मतदार याद्या अद्ययावत करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. एकीकडे यादीतून मतदारांची नावे वगळायची नाहीत, तर दुसरीकडे मतदार यादी अद्ययावत करण्याच्या या निर्णयामुळे बोगस मतदान टाळणे शक्य होणार आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी घेण्यात आलेल्या मतदार पुनरीक्षण मोहिमेत पत्त्यावर न आढळून आलेल्या लाखो मतदारांची नावे वगळण्यात आली होती. परिणामी मतदार यादीत नाव नसल्याच्या कारणास्तव मोठा गजहब होऊन अनेकांना मतदानापासून वंचित राहावे लागले व प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचून आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले होते. या सर्व गोष्टींची दखल घेत आयोगाने पुन्हा मतदार नोंदणी राबविलीच; परंतु स्थलांतरित, दुबार वा मयत मतदारांची नावे स्वत:हून कमी न करता ती यादीत आहेत तशीच राहू देण्याच्या सूचना सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत लोकसभा निवडणुकीत वापरण्यात आलेल्या मतदार यादीबरोबरच ३१ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली अंतिम मतदार यादी व नुकत्याच राबविण्यात आलेल्या मोहिमेत नावनोंदणी केलेल्या मतदारांच्या पुरवणी यादीत नाव असलेल्यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे; परंतु असे असतानाही बोगस मतदान होऊ नये म्हणून आयोगाने केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या मदतीने घरोघरी जाऊन याद्यांचे अद्ययावतीकरण करण्याचे ठरविले आहे.
केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना त्यांच्या विभागनिहाय मतदार याद्यांची फोड करून दिली जाणार असून, हे अधिकारी घरोघरी जाऊन मतदारांची खात्री करतील. त्यात प्रामुख्याने घरी गैरहजर असलेले मतदार, स्थलांतरित झालेले मतदार व मरण पावलेले मतदार अशा प्रकारे त्यांचे वर्गीकरण करण्यात येणार आहे. मतदार यादीवरच मतदाराच्या नावासमोर केंद्रस्तरीय अधिकारी खूण करतील व त्यानंतर मूळ मतदार यादीत प्रत्येक मतदारासमोर तसा शिक्का मारण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी राजकीय पक्षांना तसेच मतदान केंद्र अधिकाऱ्यांना चटकन ते निदर्शनास येऊन स्थलांतरित मतदार मतदानासाठी आला तर त्याची विचारपूस करणे सुलभ होणार आहे. याचबरोबर मयत मतदारांच्या नावापुढे शिक्का असल्याने त्यांच्या नावे बोगस मतदान टाळता येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Updating lists will not prevent bogus voting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.