आवाजविरहित फटाके खरेदीकडे वाढला कल
By Admin | Updated: November 10, 2015 23:40 IST2015-11-10T23:40:18+5:302015-11-10T23:40:18+5:30
शोभेच्या फटाक्यांना बालगोपाळांची पसंती

आवाजविरहित फटाके खरेदीकडे वाढला कल
प्रवीण जाधव नाशिक
पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करण्याबाबत विविध शाळांमधून जनजागृती वाढल्याने, तसेच पर्यावरणप्रेमी व समाजसेवी संघटनांकडून प्रबोधनात्मक प्रचार-प्रसारावर भर देण्यात आल्याने आवाजविरहित फटाके खरेदीकडे नागरिकांचा कल वाढला आहे. त्याचबरोबर शालेय मुलांकडूनही शोभेच्या फटाक्यांना पसंती दिली जात आहे.
प्रकाशाचा उत्सव अर्थात दीपावलीला सुरुवात झाल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पसरले आहे. शहरातील बाजारपेठांमध्ये नवचैतन्य आले आहे. पूजेच्या साहित्याबरोबरच नवीन कपडे, पादत्राणे, आकाशकंदील, भेटवस्तू, भेटकार्डे, फटाके आदि वस्तू खरेदी करताना नागरिक दिसत आहेत. दरम्यान, शहरातील गंगापूररोडवरील डोंगरे वसतिगृह मैदान, गोल्फ क्लब मैदानावर थाटलेल्या फटाका विक्रीच्या दुकानांवरही ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे; मात्र बहुसंख्य पालक आवाजविरहित फटाके खरेदीवर भर देत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे बालगोपाळदेखील शोभेच्या फटाक्यांची निवड करताना दिसत आहे.
भुईचक्र, सुरसुरी, फ्लॉवर पॉट, कागदी आतषबाजी करणाऱ्या इको फ्रेण्डली फटाक्यांना यावर्षी अधिक मागणी असल्याचे विक्रेता अमोल बर्वे यांनी सांगितले. कमी आवाजाचे व आवाजविरहित फटाक्यांमुळे जरी वायुप्रदूषण काही प्रमाणात होत असले तरी ध्वनिप्रदूषणाला आळा बसत असल्याने समाधान व्यक्त केले जात आहे. विविध शाळांमध्ये पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करत फटाके न फोडण्याच्या शपथविधीचा कार्यक्रम घेण्यात आल्यामुळे यंदा फटाके खरेदीबाबत पालकांकडे मुलांचा हट्ट कमी झालेला दिसून येत आहे.
एकूणच येणाऱ्या पिढीमध्येदेखील पर्यावरणाची जाणीव व सामाजिक बांधीलकीचे भान निर्माण होत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. सण-उत्सव साजरे करताना पर्यावरणाचा समतोल कसा राखला जावा, यादृष्टीने भावी पिढी सजग होत असून ही भविष्याच्या दृष्टीने अत्यंत सकारात्मक बाब असल्याचे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे.