दिंडोरी तालुक्याला अवकाळीचा तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:14 IST2021-05-01T04:14:30+5:302021-05-01T04:14:30+5:30
वरखेडा : दिंडोरी तालुक्यासह आसपासच्या भागाला शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने ...

दिंडोरी तालुक्याला अवकाळीचा तडाखा
वरखेडा : दिंडोरी तालुक्यासह आसपासच्या भागाला शुक्रवारी (दि. ३०) सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने तडाखा दिला. यावेळी गारांचाही वर्षाव झाला. वरखेडा, आंबेवणी, चिंचखेड, जोपुळ, धामणवाडी, जवळके वणीसह तालुक्यातील अनेक गावांना अवकाळीने झोडपले. यामुळे खरड छाटणी झालेल्या द्राक्ष बागा आणि खळ्यात काढून ठेवलेला कांदा, गव्हाचे मोठे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता.
हवामान विभागाने राज्यातील काही भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवली होती. मागील चार दिवसात काही भागात वातावरण ढगाळ होते. दिंडोरीत सलग तीन दिवस पावसाने हजेरी लावली. परंतु, शुक्रवारी सायंकाळी दिंडोरीसह तालुक्यातील चिंचखेड, जोपुळ, धामणवाडी, जवळके वणी, खेडगाव यासह बऱ्याच गावांना त्याचा फटका बसला. अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला. कोरोनाविषयक निर्बंध लागू असल्याने पावसामुळे वीजपुरवठा वगळता अन्य गैरसोय झाली नाही. पावसानंतर वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला होता.