सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमधून दुर्घटनेचा उलगडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:16 IST2021-04-23T04:16:50+5:302021-04-23T04:16:50+5:30
नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात आणि बाहेरही सीसीटीव्ही कॅमेरे असून त्यातून दुर्घटना कशी घडली याचा उलगडा होण्याची ...

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमधून दुर्घटनेचा उलगडा
नाशिक : महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात आणि बाहेरही सीसीटीव्ही कॅमेरे असून त्यातून दुर्घटना कशी घडली याचा उलगडा होण्याची शक्यता आहे. प्रशासन यासंदर्भात आता फुटेजची तपासणी करणार आहे. त्यामुळे व्हॉल्व कसा फुटला, गळती कशी झाली याची वस्तुस्थिती समेार येण्याची शक्यता आहे.
दरम्यान रुग्णालयातील दुर्घटनेला चोवीस तास उलटूनही महापालिकेकडून कोणतीही कारवाई अथवा गुन्हा दाखल करण्यात पुढाकार घेतला गेलेला नाही.
महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात बुधवारी (दि.२१) दुपारी पावणेबारा वाजता ऑक्सिजन टाकीतून गॅस गळती झाल्याने खळबळ उडाली होती. ऑक्सिजन गळतीबाबत वेगवेगळे प्रकार पुढे येत आहेत. काहींनी टँकरमधून गॅस भरला जात असताना प्रेशरमुळे गळती झाल्याचा दावा केला होता. तर प्रशासनाने मात्र स्पष्ट कारण केले नसले तरी आयुक्त कैलास जाधव यांनी टाकीतून वेपरोयाझरमध्ये द्रवरूप ऑक्सिजन पाठवताना जोडणीवर गळती झाली असे सांगितले होते. ऑक्सिजन प्रेशरमुळे ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात होते. त्यामुळे नक्की काय झाले ते स्पष्ट होऊ शकले नव्हते. महापालिकेने निखिल आणि पिनॅकल या अन्य दोन ऑक्सिजन पुरवठादार कंपन्यांच्या तंत्रज्ञांना बोलावले हेाते. त्यांनी घटनास्थळी येऊन पाइपलाइनला वेल्डिंग करून गळती थांबवली होती. गळती का झाली याबाबत अनेक शंका कुशंका असून त्यामुळे प्रत्यक्षदर्शींबरोबरच आता या टाकीच्या बाजूने आणि टाकीवर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमधूनदेखील घटनाक्रम लक्षात येणार आहे. आता प्रशासन हे फुटेज घेणार आहे.
दरम्यान, ऑक्सिजन टाकी दहा वर्षांसाठी भाड्याने घेतल्यानंतर या टाकीची देखभाल दुरुस्तीदेखील ठेकेदार कंपनीकडेच आहे. परंतु कंपनीकडे पुरेसे तंत्रज्ञच नाही किंबहुना एकच जण हे देखभाल दुरुस्तीचे काम करीत आहे. महापालिकेत सातत्याने काम करायचे असेल तर संबंधित ठेकेदाराला नाशिकमध्ये ऑफिस सक्तीचे करावे लागते, तसेच तंत्रज्ञदेखील आवश्यक असतो. महापालिकेने काढलेल्या निविदेत अशी अट होती की नाही आणि नसेल तर इतक्या महत्त्वाच्या विषयात शिथिलता का दिली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे इतकी मोठी दुर्घटना घडल्यानंतरदेखील संबंधित कंपनीचे अधिकारी नाशिकमध्ये दाखल झालेले नाही, ते शुक्रवारी (दि.२३) दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले.
इन्फो...
मनपाकडून अद्याप चाैकशी नाही.
इतकी मोठी दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाने आपल्या स्तरावर तरी चौकशी करणे आवश्यक होते. मात्र, राज्य शासनाने उच्चस्तरीय चौकशी समितीची घोषणा केल्यानंतर महापालिकेने अशी कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
इन्फो...
नव्या टाकीला अवघ्या २० दिवसात गळती
रुग्णालयात ठेकेदाराने बसवलेली टाकी ३१ मार्चपासून वापरण्यास सुरुवात झाली होती. म्हणजे अद्याप एक महिनाही झाला नाही. परंतु २१व्या दिवशी पाइपलाइनची गळती झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. नवीन टाकीला गळती कशी काय लागू शकते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
इन्फो..
ऑक्सिजन टाकीत किती ऑक्सिजन आला आणि वापरला गेला अशा प्रकारच्या कामासाठी शहर अभियंता संजय घुगे यांनी बांधकाम विभागाचे दोन अभियंता नियुक्त केले होते. घटना घडली त्यावेळी ऑक्सिजन टँकरदेखील येणार होता, मग अशा वेळी संबंधित अभियंते नक्की कुठे होते असाही प्रश्न केला जात आहे.