मुक्त विद्यापीठाआडून नाशिकवर अन्याय, शिवसेनेचा आरोप
By Admin | Updated: July 14, 2016 01:01 IST2016-07-14T01:00:27+5:302016-07-14T01:01:08+5:30
मुक्त विद्यापीठाआडून नाशिकवर अन्याय, शिवसेनेचा आरोप

मुक्त विद्यापीठाआडून नाशिकवर अन्याय, शिवसेनेचा आरोप
नाशिक : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे २२० पैकी १४५ अभ्यासक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाने बंद केले असून केंद्र सरकार आता विद्यापीठाआडून नाशिकवर अन्याय करीत असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. यासंदर्भात पक्षाने कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांना निवेदन देऊन जाब विचारला असून या गोंधळास जबाबदार कोण याचा खुलासा मागितला आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे वंचितांच्या शिक्षणासाठी स्थापन झालेले आहे. ज्ञानगंगा घरोघरी हे त्यांचे ब्रीद आहे; मात्र आता उलटी ज्ञानगंगा वाहत आहे. विद्यापीठाचे अभ्यासक्रम केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाअंतर्गत असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोगाने नाकारले असून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होणार आहे. अभ्यासक्रम राबविण्यात चुका असतील तर आयोगाने विद्यापीठावर कारवाई करावी, अभ्यासक्रम नाकारून विद्यार्थ्यांना दंडीत करण्याचे कारण काय, असा प्रश्न शिवसेनेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी केला आहे. पंतप्रधान मोदी हे एकीकडे स्किल इंडियाचा नारा देतात आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील एका चांगल्या विद्यापीठाची अडवणूक सुरू असून सर्व व्यावसायिक अभ्यासक्रमांनाच नाकारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, युवासेनेच्या वतीने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांना निवेदन देण्यात आले असून त्यात विद्यापीठाच्या नाकारलेल्या अभ्यासक्रमांच्या गोंधळास जबाबदार कोण याबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आदित्य बोरस्ते, गणेश बर्वे, प्रशांत काळे, विशाल खैरनार, अमित पाटील यांनी केली आहे.