सायकलस्वाराचा रॅलीत दुर्दैवी मृत्यू
By Admin | Updated: February 8, 2015 23:48 IST2015-02-08T23:48:37+5:302015-02-08T23:48:57+5:30
सायकलस्वाराचा रॅलीत दुर्दैवी मृत्यू

सायकलस्वाराचा रॅलीत दुर्दैवी मृत्यू
नाशिक : नाशिक सायकलिस्टच्या वतीने आयोजित सायकल रॅलीत सहभागी झालेले सायकलस्वार दिलीप रामचंद्र बोरावके (५२) यांचा घोटीनजीक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.
सायकल रॅलीला सकाळी नाशिक येथून प्रारंभ झाला होता. घोटीमार्गे वैतरणा डॅम, त्र्यंबकेश्वर, अंबोली फाटा, कश्यपी धरण मार्गे सायकल रॅली निघाली होती. या रॅलीत दिलीप बोरावके हेदेखील सहभागी झाले होते. खंबाळेनजीक चढ चढत असताना त्यांना अचानक त्रास होऊ लागल्याने बोरावके साकलवरून कोसळले. त्याचवेळी सायकलस्वार स्पर्धकांच्या मागे असलेल्या वैद्यकीय पथकाने त्यांना तातडीने नाशिक येथील साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूटमध्ये दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. बोरावके हे उद्योजक असून, नाशिक सायकलिस्टचे ते सक्रिय कार्यकर्ते होते.
नागरिकांनी सायकलचा वापर करावा यासाठी ते नेहमीच सक्रिय होते. सायकल रॅलीदरम्यान एका सायकलस्वाराचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सायकल रॅलीचा पारितोषिक वितरण समांरभही रद्द करण्यात आला आहे.
(प्रतिनिधी)