विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र
By Admin | Updated: July 26, 2014 00:49 IST2014-07-26T00:40:38+5:302014-07-26T00:49:41+5:30
विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र

विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे आंदोलन तीव्र
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून आंदोलन पुकारलेल्या वर्ग तीन आणि चार कर्मचारी संघटनेने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून, आता सामूहिक रजेतही वाढ करण्यात आली आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार निवृत्तिवेतन योजना, परिभाषित अंशदायी वेतन योजना लागू करावी तसेच मूलभूत स्वरूपाच्या दयेय असलेल्या सुविधा लागू कराव्यात या मागणीसाठी वर्ग तीन, चार संघटनेचे कर्मचारी गेल्या काही दिवसांपासून सामूहिक रजेवर आहे.
या आंदोलापूर्वी कर्मचाऱ्यांनी अनेकदा आंदोलने केलेली आहे. मात्र मागण्यांची दखल अद्यापही घेण्यात आली नसल्याने पुन्हा एकदा आंदोलन केले जात असल्याचे संघटनेच्या वतीने अध्यक्ष राजेश इस्ते यांनी सांगितले. शासनस्तरावर या मागण्यांची व्यापक चर्चा झालेली आहे. मागण्या मान्य करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. परंतु शासनाने प्रत्यक्षात कृती केली नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी आहे. शिवाय विद्यापीठाकडूनही पाठपुरावा केला जात नसल्याने कर्मचाऱ्यांनी आता माघार न घेता प्रश्न तडीस नेण्यासाठी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या पाच दिवसांपासून कर्मचाऱ्यांनी रजा आंदोलन पुकारले होते. आंदोलनातील कर्मचाऱ्यांनी रजा टाकून आंदोलन सुरू ठेवले होते. आता या पाच दिवसीय रजेचीदेखील मुदत संपल्याने कर्मचारी संघटनेने आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यास शासन आणि विद्यापीठ असमर्थ ठरल्याचा आरोप करीत कर्मचारी संघटनेकडून जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. दरम्यान, नाशिकमध्ये येणाऱ्या मंत्र्यांचे, आमदार, खासदारांचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी साकडे घातले जात आहे. संघटनेचे नेते लोकप्रतिनिधिंना भेटून प्रश्न सोडविण्यासाठी मदतीची याचना करीत आहेत.
या आंदोलनात संघटनेचे कर्मचारी सहभागी असून, व्यापक आंदोलनाची संघटनेची तयारी असल्याचे अध्यक्ष इस्ते, कार्यकारी अध्यक्ष दीपक चव्हाण, सचिव दीपक सांगळे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)