विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे पुन्हा कामबंद ‘अस्त्र’
By Admin | Updated: July 19, 2014 21:11 IST2014-07-19T00:11:27+5:302014-07-19T21:11:49+5:30
विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे पुन्हा कामबंद ‘अस्त्र’

विद्यापीठ कर्मचाऱ्यांचे पुन्हा कामबंद ‘अस्त्र’
नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील वर्ग तीन आणि चार कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्यांसाठी पुन्हा एकदा कामबंद आंदोलन पुकारण्यात आले असून, कर्मचाऱ्यांनी काळ्याफिती लावून प्रशासनाचा निषेध केला आहे.
विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियमानुसार निवृत्तिवेतन योजना लागू करण्यात आलेली नाही. यासंदर्भात अनेकदा विद्यापीठात आंदोलने झाली आहेत, तसेच कामबंद आणि उपोषणदेखील करण्यात आलेले आहे. मात्र अजूनही या मागणीची पूर्तता होऊ शकलेली नाही, असा आरोप संघटनेने केला आहे.
यासंदर्भात संघटनेचे नेते राजेश इस्ते यांनी सांगितले की, कर्मचाऱ्यांच्या या मागणीची दखल घेत उपमुख्यमंत्र्यांनी तातडीची बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन दिले होते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी मंत्र्यांच्या भूमिकेचा मान राखत कामबंद आंदोलन मागे घेतले होते. मात्र अजूनही कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करण्यात आलेली नाही.
त्यामुळे कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती योजना, अंशदायी निवृत्तिवेतन योजना आदिंचा लाभ मिळणे कठीण झालेले आहे. या मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले आश्वासन तसेच हिवाळी अधिवेशनातदेखील तारांकीत प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता. मात्र अजूनही या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे स्थगित आंदोलन पुन्हा सुरू करीत असल्याचे इस्ते यांनी सांगितले. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार इस्ते यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)