पदाधिकाऱ्यांची एकी, अधिकाऱ्यांची दुफळी
By Admin | Updated: November 6, 2015 23:25 IST2015-11-06T23:24:00+5:302015-11-06T23:25:55+5:30
सिन्नर : गटविकास अधिकारी व सहायक गटविकास अधिकाऱ्यांचे मतभेद चव्हाट्यावर

पदाधिकाऱ्यांची एकी, अधिकाऱ्यांची दुफळी
सिन्नर : सिन्नर पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीत दरवेळी आपसात भांडणाऱ्या पदाधिकाऱ्यांमध्ये ‘एकी’चे तर अधिकाऱ्यांमध्ये ‘दुफळी’चे प्रदर्शन सभागृहात घडले. गटविकास अधिकारी धनंजय जगताप व सहायक गटविकास अधिकारी मधुकर वाघ यांचे मतभेद आढावा बैठकीत चव्हाट्यावर आल्याचे दिसून आले. दरवेळी लोकप्रतिनिधींच्या आरोप-प्रत्यारोपांच्या बैठकी अनुभवणाऱ्या खातेप्रमुखांना यावेळी मात्र गटविकास अधिकारी व सहायक गटविकास अधिकाऱ्यांच्या नाराजी नाट्याचा खेळ पाहण्याची वेळ आली.
सुमारे वर्षभर सिन्नर पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून काम पाहिलेले सहायक गटविकास अधिकारी वाघ व गटविकास अधिकारी म्हणून सहा महिन्यांपूर्वी रुजू झालेले जगताप यांच्यातील मतभेद लपून राहिलेले नाही.
वाघ प्रभारी गटविकास अधिकारी असताना त्याचे पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबतही सूत जुळले नव्हते. सभापती संगीता काटे यांनी वाघ यांची बदली न झाल्यास कामकाजात भाग न घेण्याचा व बहिष्काराचा पवित्रा घेतला होता. त्यानंतर पंचायत समितीला गटविकास अधिकारी म्हणून जगताप लाभले. जगताप व वाघ यांचेही विविध कारणांवरून उघड मतभेद दिसून येत असल्याने पंचायत समितीचे प्रशासन चर्चेचा विषय झाले आहे.
प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून वर्षभर काम करताना आढावा बैठक हाताळणारे वाघ शुक्रवारी झालेल्या आढावा बैठकीत चक्क शेवटच्या खुर्चीवर आसननस्थ झालेले दिसून आले. पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना खातेप्रमुखांजवळ पुढील खुर्चीवर येऊन बसण्याची विनंती केल्यानंतरही त्यांनी ऐकले नाही. त्यावरून उभय अधिकाऱ्यांमधील मतभेद टोकाला गेल्याचे दिसून आले. आढावा बैठकीत विरोधी पदाधिकाऱ्यांमध्ये एकी दिसून आली असताना दुसऱ्या बाजूला अधिकाऱ्यांमध्ये मतभेद दिसून आल्याने पंचायत समितीचा कारभार सुरळीत व्हावा, अशी अपेक्षा सर्वसामान्यांकडून व्यक्त केली जात आहे.