उपचाराअभावी मातेचा दुर्दैवी मृत्यू

By Admin | Updated: July 5, 2014 00:19 IST2014-07-04T23:34:50+5:302014-07-05T00:19:17+5:30

उपचाराअभावी मातेचा दुर्दैवी मृत्यू

The unfortunate death of mother due to lack of treatment | उपचाराअभावी मातेचा दुर्दैवी मृत्यू

उपचाराअभावी मातेचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक : डॉक्टरांनी पुकारलेल्या संपामुळे वेळेवर आणि पुरेसे वैद्यकीय उपचार न मिळाल्याने हरसूल येथील चोवीस वर्षीय माता आपल्या तीन महिन्यांच्या तान्हुलीला सोडून गेली. माता जवळ नसल्यामुळे जिवाच्या आकांताने रडणाऱ्या त्या बाळाकडे पाहणाऱ्या प्रत्येकाच्या काळजाला पीळ पडत आहे. ज्या डॉक्टरांना रुग्णांनी देवाचे स्थान दिले आहे, त्यांनीच पाठ फिरविल्यामुळे त्या बाळाच्या जिवासाठी आता देवाकडे धावा करण्याची वेळ आली आहे.
आपल्या फायद्याच्या आणि संरक्षणाच्या मागण्यांसाठी वैद्यकीय अधिकारी रस्त्यावर उतरले; मात्र त्यासाठी त्यांनी रुग्णांचा जीवच दावणीला बांधला आहे. मागण्या मान्य झाल्या तरच रुग्ण वाचतील अशाच मानसिकतेने हे डॉक्टर्स संप अधिक तीव्र करण्याची भाषा बोलत आहेत. त्यांच्या याच निष्ठूर मानसिकतेमुळे राज्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. दोनच दिवसांपूर्वी नाशिकमधील डॉक्टरांनी एका बालिकेवर उपचार करण्यास सपशेल नकार देत आमच्या मागण्या महत्त्वाच्या असल्याचे छाती फुगवून सांगितले होते. याच जिल्ह्णात आज एक माता उपचाराअभावी मरण पावली. घटना त्र्यंबकेश्वर तालुक्यातील हरसूल येथील आहे. वनिता भागीरथ भगरे (२४) ही तीन महिन्यांची बाळंत महिला ताप आणि डोकेदुखीने त्रस्त असल्याने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आली होती. तेथील डॉक्टरांनी परिचारिकेकरवी नेहमीप्रमाणे सलाईनचा डोस भरला आणि डॉक्टर्स संपात सहभागी होण्यासाठी नाशिकला निघून आले. सलाईन संपल्यानंतर तेथील परिचारिकेने महिलेस सोडून दिले. रात्री पुन्हा तिला त्रास झाल्यानंतर सकाळी तिला अत्यवस्थ स्थितीत रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र तेथे डॉक्टर नसल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी तिला पुन्हा सलाईन भरले. परंतु डॉक्टर संपावर असल्याने पुढील वैद्यकीय उपचार करणे कठीण झाल्याने तेथील कर्मचाऱ्यांनी या महिलेसह प्रसूतीसाठी आलेल्या अन्य एका महिलेस नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय घेतला. परंतु रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर बाऱ्हे येथून येण्यास जवळपास दोन तास लागले. त्यानंतर रुग्ण घेऊन रुग्णवाहिका नाशिकला येत असतानाच आनंदवलीनजीक या मातेचा मृत्यू झाला. मातेच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे तीन महिन्यांची तिची बालिका मात्र अनाथ झाली असून, तिच्याही प्रकृतीला धोका निर्माण झाला आहे. संपावरील डॉक्टरांना या घटनेचे कितपत गांभीर्य आहे हे जिल्हा रुग्णालयातही दिसून आले. या साऱ्या प्रकारामुळे सर्वसामान्यांमध्ये मात्र या डॉक्टरांविषयी चीड निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The unfortunate death of mother due to lack of treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.