उद्यापासून कांदा लिलाव पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:13 IST2021-05-23T04:13:14+5:302021-05-23T04:13:14+5:30

उमराणेत पाचशे वाहनांना प्रवेश उमराणे : येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सोमवार (दि. ...

Undo the onion auction from tomorrow | उद्यापासून कांदा लिलाव पूर्ववत

उद्यापासून कांदा लिलाव पूर्ववत

उमराणेत पाचशे वाहनांना प्रवेश

उमराणे : येथील स्व. निवृत्ती काका देवरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज सोमवार (दि. २४) पासून पूर्ववत सुरू करण्यात येणार आहेत. मात्र कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी दररोज ५०० वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे बाजार समिती प्रशासनाने जाहीर केले आहे. सोमवारी बाजार समिती आवारात मोठ्या प्रमाणावर कांदा लिलावासाठी येऊन गर्दी होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर हे नियोजन केले आहे.

वाढत्या कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या १० दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. त्यात जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाजही बंद करण्यात आले होते. परंतु शेतकऱ्यांची कांदा माल विक्रीसाठी अडचण होऊ नये यासाठी मागील आठवड्यात व्यापाऱ्यांच्या खळ्यांवर भाव भरून देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र शेतकऱ्यांनी या निर्णयास प्रतिसाद न देता पूर्ववत लिलाव सुरू करण्याची मागणी केली होती. शिवाय गेल्या १० दिवसांच्या लाॅकडाऊननंतर कोरोना प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी झाल्याने जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्या आदेशानुसार कोरोनाविषयीचे सर्व नियम व अटी पाळून जिल्ह्यातील बाजार समित्यांचे कामकाज सुरू करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने येथील बाजार समितीचेही कामकाज सोमवारपासून सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीच्या मुख्य प्रशासक सोनाली देवरे यांनी दिली आहे. येथील बाजार समितीत मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने कोरोनासंबंधीच्या नियमांचे पालन करण्यासाठी दररोज बाजार समितीच्या मोबाईल क्रमांकावर प्रथम नोंदणी केलेल्या ५०० वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव नितीन जाधव व सहायक सचिव तुषार गायकवाड यांनी दिली आहे.

Web Title: Undo the onion auction from tomorrow