शहराला पूर्ववत दोनवेळ पाणीपुरवठा
By Admin | Updated: November 9, 2015 23:40 IST2015-11-09T23:40:20+5:302015-11-09T23:40:53+5:30
कपात शिथिल : दिवाळी उत्सवापुरता घेतला निर्णय

शहराला पूर्ववत दोनवेळ पाणीपुरवठा
नाशिक : ऐन दिवाळी उत्सवात नागरिकांना पाण्याची टंचाई भासू नये यासाठी महापालिकेने पाणीकपात शिथिल केली असून, रविवार (दि.८) पासून पुन्हा दोनवेळ पाणीपुरवठा सुरू करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांनी दिली. महापौर अशोक मुर्तडक यांनी दिलेल्या आदेशानंतर पाणीपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला आहे.
गंगापूर धरणात ७१ टक्के पाणीसाठा शिल्लक असताना ऐन उन्हाळ्यात पाणीटंचाई उद्भवू नये, याकरिता महापालिकेने दि. ९ आॅक्टोबरपासून शहरात एकवेळ पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पाणीपुरवठा विभागाने एकवेळ पाणीपुरवठ्याच्या दृष्टीने वेळापत्रक आखत त्याची अंमलबजावणी सुरू केली होती. शहराला प्रतिदिन ४१० दशलक्ष लिटर्स पाणी लागते. त्यानुसार गंगापूर धरणातून प्रतिदिनी सुमारे १४.५० दलघफू पाणी उचलले जाते. परंतु पाणीकपात लागू केल्यानंतर महापालिकेकडून ३५० दशलक्ष लिटर्स म्हणजे १२.५० दलघफू पाणी उचलणे सुरू केले. वेळापत्रकानुसार काही भागात सकाळी, तर काही भागात दुपारी आणि सायंकाळी पाणीपुरवठा करण्यात येऊ लागला.