वर्षाच्या आत भुयारी मार्गाची दुरवस्था
By Admin | Updated: June 3, 2014 02:16 IST2014-06-02T08:56:12+5:302014-06-03T02:16:18+5:30
नाशिक : द्वारका सर्कल भुयारी मार्ग काही महिन्यांपूर्वी तो पादचार्यांसाठी खुलाही झाला; परंतु त्याची दुरवस्था झाली आहे. भुयारी मार्गावरील पथदीव्यांच्या संरक्षक जाळ्या तुटल्या असून, पत्रेही फुटले आहेत.

वर्षाच्या आत भुयारी मार्गाची दुरवस्था
नाशिक : द्वारका सर्कल येथे नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलामुळे नागरिकांना रस्ता ओलांडतानाचा धोका टाळता यावा म्हणून भुयारी मार्ग करण्यात आला आणि अवघ्या काही महिन्यांपूर्वी तो पादचार्यांसाठी खुलाही झाला; परंतु त्याची दुरवस्था झाली आहे. भुयारी मार्गावरील पथदीव्यांच्या संरक्षक जाळ्या तुटल्या असून, पत्रेही फुटले आहेत.
मंुबई-आग्रा महामार्गावर गरवारे पॉइंट ते आडगावपर्यंत उड्डाणपूल उभारण्यात आला आणि नाशिकच्या नावलौकिकात भरही पडली. तसेच उड्डाणपुलाखाली दोन्ही बाजूने शहरातील रहदारीसाठी चार लेनचे रस्ते आहेत, शिवाय समांतर रस्ताही असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली.
दरम्यान, द्वारका सर्कल येथे चारपेक्षा अधिक रस्ते एकत्रित येतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या आहे; पण पादचार्यांनाही रस्ता ओलांडणे धोक्याचे असल्याने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याठिकाणी भुयारी मार्गाचे काम केले. त्यामुळे रस्ता ओलांडण्याचा धोका कमी होणार, असा कयास होता. प्रत्यक्षात नागरिकांचा सदरील भुयारी मार्गाला अत्यंत अल्पप्रतिसाद लाभला. मार्गाचा वापर होत नसल्याने टवाळखोरांकडून भुयारी मार्गातील पथदीव्यांचे नुकसान करण्यात आले आहे. दिव्यांच्या संरक्षक जाळ्या गायब झाल्या आहेत. जागोजागी कचरा साचलेला आहे तर गेल्या आठवड्यामध्ये झालेल्या वादळी पावसाने पत्र्यांचेही नुकसान झाले असून, काही ठिकाणी पत्रे तुटले आहेत. अवघ्या काही महिन्यांत भुयारी मार्गाच्या झालेल्या दुरवस्थेमुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यासंदर्भातील देखभाल दुरुस्ती न केल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे.