अभोणा पोलीस ठाणेअंतर्गत ५९ गावांत ‘एक गाव, एक गणपती’
By Admin | Updated: September 23, 2015 23:09 IST2015-09-23T23:08:42+5:302015-09-23T23:09:12+5:30
पोलीस प्रशासनाकडून ग्रामस्थांचे कौतुक

अभोणा पोलीस ठाणेअंतर्गत ५९ गावांत ‘एक गाव, एक गणपती’
अभोणा : गट-तट निर्माण होऊन वादाला तोंड फुटते. यातूनच पुढे भांडण तंटा वाढत जातो, त्यामुळे गावातील ऐक्य अबाधित राहावे, यासाठी शासनाने ‘एक गाव, एक गणपती’ ही संकल्पना पुढे आणली. या संकल्पनेला यंदा जिल्हाभरातून चांगला प्रतिसाद मिळत असून, कळवण तालुक्यातील अभोणा पोलीस ठाणेअंतर्गत तब्बल ५९ गावांमध्ये ही संकल्पना राबविण्यात आली असल्याची माहिती अभोणा पोलीस ठाण्याच्या सहायक पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी दिली.
गावात एकी राहावी, यासाठी शासनस्तरावर अनेक प्रयत्न केले जातात. त्याचाच एक भाग म्हणून एक गाव एक गणपती संकल्पना पुढे आली. ज्या गावांमध्ये ही संकल्पना राबविण्यात आली. त्या गावांमध्ये गणेशोत्सवामध्ये वादावादीचे प्रसंग घडलेच नाहीत, असे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे या संकल्पनेला शासनस्तरावरून गावकऱ्यांना प्रोत्साहन मिळू लागले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कळवण तालुक्याने एक गाव एक गणपती योजनेत चांगला सहभाग घेतला आहे.
दरवर्षी गणेशोत्सवामध्ये आपल्याला कुठे तरी वादावादी झाल्याचे ऐकायला किंवा पाहायला मिळतेच; मात्र ज्या गावांमध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबविण्यात आली. त्या गावांमध्ये वादावादीचे प्रकारच घडले नाही. त्यामुळे या गावांमध्ये पोलिसांना मिरवणुकीमध्ये जादा कुमक पाठविण्याची कधीच गरज पडत नाही. (वार्ताहर)