शहरात अघोषित वीज भारनियमन
By Admin | Updated: October 3, 2015 22:53 IST2015-10-03T22:51:48+5:302015-10-03T22:53:11+5:30
लपंडाव सुरूच : अधिकाऱ्यांकडून मात्र सारवासारव

शहरात अघोषित वीज भारनियमन
नाशिक : शहरात मुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला विजेचा लपंडाव हा अघोषित भारनियमनाचा प्रकार असल्याचे वृत्त आहे. नागरिकांची ओरड होऊ नये यासाठी अधिकृतरीत्या तसे जाहीर केले जात नसून नागरिकांना मात्र त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
राज्यातील जलाशयांमध्ये अपुरा साठा असल्याने उन्हाळ्यात जलविद्युत केंद्रात विद्युत निर्मितीच्या अडचणी येतात. या काळात विजेची मागणीही वाढत असल्याने विजेची मागणी पूर्ण होऊ शकत नाही, त्यामुळे भारनियमन होते हे स्वाभाविक असले तरी, सध्या पावसाळा अद्याप खऱ्या अर्थाने संपलेला नसताना आताच महावितरणला वीज समस्येला सामोरे जावे लागत आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात विजेचा लपंडाव सुरू असून, काही भागात विजेची ये-जा सुरू असते. तर काही भागात अनेक तास वीज गायब असते. या प्रकारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दूरध्वनी न उचलणे किंवा वास्तविक कारणे न सांगणे नेहमीचेच झाले आहे. तथापि, मिळालेल्या माहितीनुसार आता अघोषित भारनियमन करण्यात येत आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार वीज भारनियमन करण्यापूर्वी केवळ भ्रमणध्वनीवरून वीज पुरवठा खंडित करण्याची सूचना केली जाते आणि त्यानंतर वीज पुरवठा खंडित केला जातो.
नागरिकांचा भारनियमनालाही विरोध नाही, मात्र तसे जाहीर केले, तर त्यादृष्टीने नियोजन करणे सोपे होेते. विशेषत: व्यावसायिक, रुग्णालये आणि उद्योजकांना त्यानुसार कामाचे वेळापत्रक ठरविता येते, त्यामुळे भारनियमन असेलच तर तसे अगोदरच घोषित करावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)