अनियंत्रित झालेल्या कारने महाविद्यालयीन विद्यार्थ्यास चिरडले
By Admin | Updated: March 21, 2017 00:39 IST2017-03-21T00:39:05+5:302017-03-21T00:39:30+5:30
आडगाव नाक्यावरील घटना : महिला कारचालकावर गुन्हा

अनियंत्रित झालेल्या कारने महाविद्यालयीन विद्यार्थ्यास चिरडले
पंचवटी : भरधाव अल्टो कारच्या धडकेत एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी (दि़२०) दुपारी सव्वा वाजेच्या सुमारास आडगाव नाक्यावरील स्वामीनारायण शाळेजवळ घडली़ मयत विद्यार्थ्याचे नाव मनोज सुभाष बाविस्कर (१९, रा़ चव्हाण मळा, साईप्रेम हॉटेलशेजारी, तपोवन, नाशिक) तर जखमी विद्यार्थ्याचे नाव विशाल पालवे (रा़ चव्हाण मळा, तपोवन, नाशिक) असे आहे़ या अपघातप्रकरणी कारचालक महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़आडगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वामीनारायण मंदिराजवळील हॉटेल साईप्रेम रस्त्यावर मनोज बाविस्कर व विशाल पालवे हे दोघे आपल्या अॅक्टिवा दुचाकी (एमएच १५, ईएन ८३६२) जवळ उभे होते़ त्यावेळी भरधाव आलेल्या अल्टो कारने (एमएच १५, ईपी १३७७) या दोघांना जबर धडक दिली़ यामध्ये मनोज बाविस्कर हा रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाच्या संरक्षक जाळीवर फेकला गेला़ संरक्षक जाळी मानेत घुसल्याने तसेच डोक्यावर आघात झाल्याने मनोज हा गंभीर जखमी झाला़ त्यास अशोक कापसे यांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ़ गायकवाड यांनी तपासून मयत घोषित केले़ तर दुसरा जखमी पालवेवर उपचार सुरू आहेत़
या अपघातात मृत झालेला मनोज बाविस्कर हा केटीएचएम महाविद्यालयात शिक्षण घेत असून बारावीचे पेपर देत होता़ त्याच्या पश्चात आई, वडील व दोन बहिणी असा परिवार आहे़ याप्रकरणी आडगाव पोलिसांनी अल्टो कारचालक महिला राजश्री राहुल महाजन (रा़ हिरावाडी, पंचवटी, नाशिक) विरोधात अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे़ (वार्ताहर)